खेड तालुकास्तरीय वक्तृत्व, निबंध स्पर्धेत बिजघर नं. १ शाळेचे घवघवीत यश

शुभ्रा जंगम हिचे वक्तृत्वात प्रथम, निबंधात तृतीय; शौर्य मर्चंडे याचीही दुहेरी कामगिरी

खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित खेड तालुकास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेत बिजघर नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. मोठ्या गटातील शुभ्रा भगवान जंगम हिने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. लहान गटातील शौर्य मंगेश मर्चंडे याने वक्तृत्व व निबंध या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत शाळेच्या यशात मोलाची भर घातली.
प्रत्येक प्रभागातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ही तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात आली. त्यामुळे या स्पर्धेत विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सिद्ध करण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली. बिजघर नं. १ शाळेच्या शुभ्रा जंगम आणि शौर्य मर्चंडे यांनी आपल्या ओघवत्या वक्तृत्वशैलीने, विषयाची सखोल समज आणि आशयाची प्रभावी मांडणी करत उपस्थितांची मने जिंकली. दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांतील गुणवत्तेचे दर्शन घडले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक शैलेश पराडकर, संदीप घाणेकर, विजय सकपाळ तसेच मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांच्या मार्गदर्शनासोबतच विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत, विषयाची तयारी आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण यामुळे त्यांना हे यश मिळवता आले.
खेड नं. १ शाळेत पार पडलेल्या या स्पर्धेच्या आयोजनात स्पर्धाप्रमुख म्हणून केंद्रप्रमुख प्रभाकर कोळेकर, केंद्रप्रमुख राहुल जाधव, दीप्ती यादव, रवींद्र देवळेकर आणि तृप्ती म्हात्रे यांनी जबाबदारी सांभाळली. विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे मांडता यावेत, भाषिक कौशल्य विकसित व्हावे आणि लेखन-वक्तृत्वाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टीने अशा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित झाले.
बिजघर नं. १ शाळेच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी गायत्री माने, खोपी विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी संदीप कंदूरकर, केंद्रप्रमुख महेंद्र जाधव, हेदली केंद्राचे केंद्रप्रमुख सदाशिव राठोड तसेच पतपेढीचे माजी संचालक संतोष उतेकर यांनी यशस्वी विद्यार्थी आणि शाळेचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.