सकाळी ९ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते ६ मिळणार उपचार
लॅब, एक्स-रेसह अन्य रुग्णसेवाही उपलब्ध
कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाच्या (ओपीडी) वेळेत बदल करण्यात आला असून, गेल्या महिनाभरापासून रुग्णांना सकाळी ९ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत वैद्यकीय उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे रुग्णांना सायंकाळच्या वेळेतही उपचार घेता येणार असून, रुग्णालयातील ओपीडी सेवांचा लाभ घेणे अधिक सोयीचे होणार आहे.
यापूर्वी उपजिल्हा रुग्णालयात सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेतच ओपीडी सेवा सुरू होती. त्यामुळे या वेळेत रुग्णालयात पोहोचू न शकणाऱ्या रुग्णांना उपचार घेण्यासाठी अडचणी येत होत्या. आता ओपीडीसाठी सायंकाळचे स्वतंत्र सत्र सुरू करण्यात आल्याने रुग्णांना उपचारासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध झाला आहे.
या बदललेल्या वेळापत्रकानुसार सायंकाळी ४ ते ६ या वेळेतही रुग्णांना डॉक्टरांकडून तपासणी करून घेता येणार आहे. तसेच प्रयोगशाळा (लॅब), एक्स-रे आणि अन्य ओपीडीशी संबंधित सेवाही सायंकाळच्या सत्रात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे केवळ वैद्यकीय तपासणीच नव्हे, तर आवश्यक तपासण्यांसाठीही रुग्णांना या वेळेचा लाभ घेता येणार आहे.
रुग्णालयातील ओपीडीच्या वेळेत करण्यात आलेल्या या बदलाची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच सकाळच्या सत्रासोबतच सायंकाळी ४ ते ६ या वेळेत उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संबंधित रुग्णालय प्रशासनाने केले आहे.













