वायंगणी-पाटवाडीत विजेचा धक्का लागून कंत्राटी कामगार गंभीर जखमी

आचरा प्रतिनिधी :
वायंगणी-पाटवाडी येथे विद्युत खांबावर डीपीचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. राजेश गोपाळ पाटणकर (वय ३२, रा. चिंदर, गावठणवाडी) असे जखमी कामगाराचे नाव आहे. काम सुरू असताना विजेचा जोरदार धक्का बसल्याने ते खांबावरून खाली फेकले गेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आचरा वीज वितरण विभागाच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

घटनेनंतर जखमी राजेश पाटणकर यांना तातडीने आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. जुवेरीया मुजावर यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय कातिवले घटनास्थळी दाखल झाले.

वायंगणी-पाटवाडी परिसरात गणेश चतुर्थीपासून सदोष वीजपुरवठा होत असल्याचे वारंवार आचरा वीज वितरण विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. परिसरातील काही ठिकाणी फ्युजच्या ठिकाणी योग्य व्यवस्था करण्याऐवजी केवळ तारा बांधून ठेवल्या जात असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विद्युत वाहिनीमध्ये दोष असल्याची माहिती संबंधित यंत्रणेला देऊनही त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप होत आहे. सदोष वीजपुरवठ्यामुळे विद्युत वाहिनी सुरूच असल्याने डीपीचे काम करताना राजेश पाटणकर यांना विजेचा जोरदार धक्का बसला, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विद्युत वाहिनीतील दोषाची पूर्वकल्पना देऊनही आवश्यक ती खबरदारी घेतली गेली नसल्यास ही बाब गंभीर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनेबाबत वायंगणीचे सरपंच रुपेश पाटकर यांनी आचरा वीज वितरण विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. चतुर्थीपासून सदोष वीजपुरवठ्याबाबत वारंवार कळवूनही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. विद्युत वाहिनी सदोष असल्याची माहिती असतानाही आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे ही गंभीर घटना घडल्याचे सांगत, या दुर्घटनेला आचरा वीज वितरणचे अधिकारी पूर्णतः जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

विद्युत खांबावर काम करताना वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करणे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे या घटनेच्या वेळी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता का, विद्युत वाहिनीतील दोष दूर करण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली होती आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेतली होती का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

या घटनेची सखोल चौकशी करून नेमकी दुर्घटना कशामुळे घडली, याची वस्तुस्थिती स्पष्ट करावी तसेच दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या गंभीर घटनेमुळे वीज वितरण विभागाच्या कामकाजातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.