राजापुरात ६ डिसेंबरपासून भव्य ‘रामकथा-ज्ञानयज्ञ सप्ताह’

मकरंदबुवा सुमंत यांचे निरूपण
ए. डी. मालपेकर ज्वेलर्स चे आयोजन

राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवात भर घालणारा एक भव्य आध्यात्मिक सोहळा येत्या डिसेंबर महिन्यात होणार आहे. कै. अनिल दशरथ मालपेकर, कै. माधूरी अनिल मालपेकर आणि ह. भ. प. कै. सौ. अनिता रविंद्र ठाकूरदेसाई यांच्या स्मृतीपित्यर्थ, ए. डी. मालपेकर ज्वेलर्स राजापूर यांच्या वतीने ‘रामकथा-ज्ञानयज्ञ सप्ताहाचे’ विशेष आयोजन करण्यात आले आहे.
हा ज्ञानयज्ञ रविवार, दिनांक ६ डिसेंबर ते शनिवार, दिनांक १२ डिसेंबर या कालावधीत यशोधन सृष्टी, पाटील मळा, राजापूर येथे दररोज सायंकाळी ४.३० ते रात्री ८.३० या वेळेत पार पडणार आहे.
आंतरराष्ट्रीय कीर्तनकार-निरूपणकार आणि समर्थभक्त ह.भ.प. श्री. मकरंदबुवा सुमंत यांच्या रसाळ आणि मधुर वाणीतून हा रामकथा ज्ञानयज्ञ रंगणार आहे. ‘अयोध्या ते राजापूर’ असा प्रभू श्रीरामांच्या जीवन चरित्राचा, त्यांच्या आदर्शांचा आणि भक्तीचा हा अभूतपूर्व जागर असणार आहे. मकरंदबुवा सुमंत यांची अभ्यासपूर्ण आणि भावपूर्ण निरूपण शैली संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असून, त्यांच्या मुखातून रामकथा ऐकणे हा श्रोत्यांसाठी एक दिव्य अनुभव ठरणार आहे.
सात दिवस चालणाऱ्या या ज्ञानयज्ञात दररोज प्रभू श्रीरामांच्या जीवनातील विविध महत्त्वाच्या प्रसंगांवर सविस्तर कथा होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रामजन्म, सीता स्वयंवर, वनवास, हनुमंत भेट, राम-रावण युद्ध आणि रामराज्याभिषेक या अलौकिक प्रसंगांचे निरूपण केले जाईल.
राजापूर शहर आणि परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी या भव्य आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संदिप मालपेकर आणि संजीवनी मालपेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.