खेड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंबवली येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६ च्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली. या यशस्वी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्राचे राज्यमंत्री (गृह-शहरी, महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज) नामदार योगेश रामदास कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. ‘आपुलकीचा मुक्काम’ या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंबवली येथे हा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
शिष्यवृत्ती परीक्षेत आंबवली शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी चिन्मयी श्रीकृष्ण खांडेकर हिने राष्ट्रीय गुणवत्ता यादीत सहावा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. याच परीक्षेत कुमारी पूर्वा सतीश यादव हिने जिल्हा गुणवत्ता यादीत ३२ वे स्थान, तर कुमार रुद्र शरद कदम याने जिल्हा गुणवत्ता यादीत १४१ वा क्रमांक मिळवला. तसेच इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी गौरी विनायक यादव हिने जिल्हा गुणवत्ता यादीत १६२ वे स्थान पटकावले. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव झाला असून, आंबवली गावाच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना नामदार योगेश कदम यांनी त्यांच्या यशाचे कौतुक केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता असून, त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाल्यास ते मोठे यश संपादन करू शकतात, हे आंबवली शाळेतील विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे.
या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सदगुरू ऊर्फ नाना महादेव कदम, खेड पंचायत समितीचे उपसभापती सुनील मोरे, सुकिवली गटाचे जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, तिसंगी गणाचे पंचायत समिती सदस्य महेंद्र भोसले, आंबवली गावचे उपसरपंच विजय यादव, वरवली केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष सपकाळ, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी यादव, उपाध्यक्षा सिद्धी यादव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गोगावले, प्रतिष्ठित नागरिक मारुती पांडुरंग यादव, राजेश यादव, विश्वास कदम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण खांडेकर आणि उपशिक्षिका रसिका रमेश रेवाळे (खांडेकर) यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि शाळेने दिलेले शैक्षणिक पाठबळ यामुळे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि शाळेचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. आंबवली शाळेच्या या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव झाला असून, विद्यार्थ्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.













