ओंकार हत्ती पोहोचला चक्क सोनुर्लीतील मेड फॉर यू रिसॉर्ट मध्ये

सावंतवाडी : गेल्या दोन दिवसापासून सोनुर्ली गावात वास्तव्यास असलेल्या ओंकार हत्तीने आज चक्क सोनुर्ली पोटये कुंभेवाडी येथील सुप्रसिद्ध मेड फॉर यू रिसॉर्ट मध्ये प्रवेश केला. सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊली मंदिराच्या परिसरात असलेला ओंकार शुक्रवारी सायंकाळी साडेचार च्या सुमारास या रिसॉर्ट मध्ये दाखल झाला. त्याला पाहताच रिसॉर्टचे मालक नंदू तारी तसेच त्यांचा मुलगा करुणेश तारी त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.

सोनुर्लीत असलेला हत्ती आपल्या रिसॉर्टच्या इकडे यावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती व गणरायाच्याच कृपेने आपली इच्छा पूर्ण झाली असे नंदू तारी यांनी प्रहार डिजिटल शी बोलताना सांगितले. रिसॉर्ट परिसरात सुमारे दोन तास फिरल्यानंतर ओंकार न्हावेलीच्या दिशेने रवाना झाला. त्याच्यासोबत काही वनकर्मचारी होते तसेच ओंकार मेड फॉर यू रिसॉर्ट मध्ये आल्याचे कळतच आणखीन वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले.

रिसॉर्ट मध्ये माड पोफळी व अनेक प्रकारची फळझाडे फुलझाडे आहेत मात्र ओकार हत्तीने कशाचेही नुकसान केले नाही. जीवनात हा एक खूप मोठा व आनंददायी अनुभव होता असेही नंदू तारी यांनी आवर्जून सांगितले.