जबाबदार लोकप्रतिनिधी हेच ग्रामविकासाचे आधारस्तंभ : सभापती शंकर घारे

तुळस येथे ‘वीलीड’ उपक्रमांतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

ग्रामंचायत सदस्य आणि सहकारी सोसायटी च्या पदाधिकारी, शेतकरी यांचा विशेष सन्मान

वेंगुर्ले : दाजी नाईक 

महिला लोकप्रतिनिधींना सक्षम नेतृत्वासाठी सहकार्य करणे आणि ग्रामविकासात पुरुषांची सकारात्मक भागीदारी वाढविण्याच्या उद्देशाने वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि कोकण विकास संस्था, पणजी (गोवा) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वीलीड’ उपक्रमांतर्गत तुळस येथील कर्मयोगी रामभाऊ तुळसकर सभागृहात पुरुषांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जबाबदार लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून ग्रामविकासाला गती मिळते, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती शंकर घारे यांनी केले.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाले. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर, श्री देव जैतिराश्रित संस्था,तुळसचे उपसरपंच नारायण कुंभार मुंबईचे कार्यवाह कृष्णा तावडे, स्थानिक प्रतिनिधी प्रकाश परब, वाचनालयाचे अध्यक्ष बापू परब, मुख्याध्यापक विनायक कोल्हे, शिक्षक संदीप तुळसकर, होडावडेचे उपसरपंच राजबा सावंत, पाल सोसायटीचे अध्यक्ष कमलेश गावडे, तुळस सोसायटीचे अध्यक्ष संतोष शेटकर आदी उपस्थित होते.

 

*पंचायत राज व्यवस्थेवर मार्गदर्शन*

 

गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी पंचायत राज व्यवस्थेची रचना, ग्रामपंचायतींचे अधिकार व कर्तव्ये, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी याविषयी माहिती दिली. ग्रामविकासासाठी योग्य नियोजन, लोकसहभाग आणि प्रशासनाशी समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

*महिला नेतृत्वाला सहकार्य करण्याचे आवाहन*

 

डॉ. आनंद बांदेकर यांनी महिला राजकीय नेतृत्वातील पुरुषांच्या भागीदारीचे महत्त्व विशद केले. महिला लोकप्रतिनिधींना भेडसावणारी आव्हाने समजून घेणे, कुटुंबात व समाजात स्त्री-पुरुष समानता रुजविणे आणि ग्रामपंचायतींमध्ये महिलांचा आत्मविश्वास व स्वतंत्र निर्णयक्षमता वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांना नेतृत्वाची संधी देण्याबरोबरच घरगुती जबाबदाऱ्यांचे समान वाटप आणि प्रत्यक्ष सहकार्यही महत्त्वाचे आहे. महिला नेतृत्वाला पाठबळ देणे आणि त्यांच्या वतीने निर्णय घेणे, यातील फरक पुरुषांनी ओळखावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

*विकासकामांना प्राधान्य देण्याचे आवाहन*

ग्रामविकासासाठी लोकप्रतिनिधी, सहकारी संस्था आणि सामाजिक संघटनांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे सभापती शंकर घारे यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून गावाच्या विकासकामांना प्राधान्य द्यावे. अशा मार्गदर्शन कार्यक्रमांमुळे कर्तव्यांची जाणीव वाढून गावाच्या विकासाला दिशा मिळते, असे त्यांनी नमूद केले.

तुळस उपसरपंच नारायण कुंभार आणि कार्यवाह कृष्णा तावडे यांनी सदर उपक्रमास शुभेछ्या दिल्या.

 

*विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव*

कार्यक्रमात तुळस, मठ, होडावडे, मातोंड आणि पाल येथील ग्रामपंचायतींचे पुरुष सदस्य, संबंधित गावांतील सहकारी संस्थांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच छत्रपती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तयांचा सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. व्यावेळी सोसायटी अध्यक्ष कलमेश गावडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार राय, ग्राम पंचायत मठ चे नित्यानंद शेणई यांनी मनोगत व्यक्त करीत असे उपक्रम दिशादर्शक ठरतात असे प्रतिपादन करीत वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस चे सन्मानाबद्दल विशेष ऋण व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक, सूत्रसंचालन प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. सचिन वासुदेव परुळकर यांनी केले, तर बबन घोडे-पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश राऊळ, विवेक तिरोडकर, सागर सावंत, रोहित गडेकर, प्रज्वल परूळकर, डॉ. गोविंद धुरी,निकिता कबरे आणि सद्गुरू सावंत यांनी परिश्रम घेतले.