क्रिकेटचा देव गणपतीपुळ्यात नतमस्तक! भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी घेतले श्री गणरायाचे दर्शन

रत्नागिरी : क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे आणि कोट्यवधी क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेले भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी सचिन तेंडुलकर यांनी श्री गणपतीची विधिवत पूजा करून घेतली. श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी देवाला साकडे घातले.

गणपतीपुळे संस्थानचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर यांनी सचिन तेंडुलकर यांना श्री क्षेत्र गणपतीपुळे आणि श्री गणपती मंदिराची महती सांगितली.

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या अद्वितीय कामगिरीने जगभरातील चाहत्यांची मने जिंकणारे सचिन तेंडुलकर आज श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक झाल्याने त्यांच्या या अनपेक्षित भेटीची रत्नागिरी जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. त्यांच्या आगमनामुळे स्थानिक नागरिक आणि क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.