नाधवडेत गोरक्षकांनी गुरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

कत्तलीसाठी ८ गुरांची वाहतूक ; सहा जणांवर गुन्हा दाखल,

टेम्पोसह गुरे पोलिसांच्या ताब्यात

वैभववाडी प्रतिनिधी
कत्तलीसाठी गुरांची वाहतूक करणारा टेम्पो गोरक्षकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. सोमवारी सकाळी १०:३० वाजता नाधवडे येथे हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

गोवंश हत्या बंदी असताना कत्तलीसाठी अद्यापही गो वंशाची राजरोसपणे वाहतूक केली जात आहे. तालुक्यात यापूर्वी अशा वाहतुकीवर पोलिसांनी कडक कारवाई केलेली आहे. असे असूनही या कारवाईला न जुमानता राजापूर, खारेपाटण येथून गुरांची वाहतूक करण्याचे प्रकार उजेडात येत आहेत. ही गुरे निपाणी जिल्हा बेळगाव येथील कत्तलखान्यात नेली जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही वाहतूक वैभववाडी मार्गे केली जात असल्याचे प्रकारही उजेडात आले आहेत.
सोमवारी सकाळी खारेपाटण येथून तरळे वैभववाडी मार्गे निपाणी कडे गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती गोरक्षक यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गोरक्षकांनी नाधवडे येथे संबंधित टेम्पोचा पाठलाग करून टेम्पो अडविला. यावेळी टेम्पो चालकांनी गोरक्षकांच्या कारला धडक देऊन त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही गोरक्षकांनी गुरांची वाहतूक होत असलेला टेम्पो नाधवडे पाल्म बीच हॉटेल येथे अडवून पोलिसांना त्याची माहिती दिली.

या टेम्पोमध्ये ८ गुरे दयनीय अवस्थेमध्ये बांधून ठेवण्यात आली होती. पोलिसांनी गुरांसह टेम्पो पोलीस ठाण्यात आणला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खारेपाटण येथून ही गुरे भरून आणण्यात आली होती.

कत्तलीसाठी गुरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालक विवेक शामराव कांबळे (रा. पडळी हाळ ता. निपाणी जि. बेळगाव) रुपेश लहू जाधव (रा. कोदवली ता. राजापूर) इम्रान लतीफ खान (रा. खारेपाटण ता. कणकवली) रिजवान रशीद मालीम (रा. तळगाव ता. राजापूर) टेम्पो मालक विलास रावसाहेब तराळ (रा. शिवाजी पेठ कोल्हापूर) व सय्यद थोडगे (रा. कोळपे ता. वैभववाडी ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुरे वाहतूक करणारा टेम्पो (क्रमांक MH 09 EM ०३८०) पोलिसांनी जप्त केला आहे.

यातील विवेक शामराव कांबळे व रुपेश लहू जाधव यांच्यावर वैभववाडी व कणकवली पोलिस ठाण्यात अशाच प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.