आठ दिवसात १३३ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण..
वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ला शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षात घेऊन नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे तसेच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. आठ दिवसात १३३ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले.
वेंगुर्ला शहरातील विविध भागांतील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यांचा धोका कमी करणे, त्यांच्या संख्येवर दीर्घकालीन नियंत्रण मिळविणे तसेच रेबीजसारख्या गंभीर आजारांचा प्रसार रोखणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
सदर मोहिमेचा पहिला टप्पा जानेवारी महिन्यात राबविण्यात आला असून, या टप्प्यामध्ये वेंगुर्ला शहरातील एकूण १४३ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये दिनांक २० ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आणखी १३३ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले आहे. अशा प्रकारे दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून एकूण २७६ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले आहे.
सदर मोहीम Society for Animal Protection, Kolhapur या संस्थेमार्फत राबविण्यात आली आहे. तसेच, उर्वरित भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यासाठी येत्या काही महिन्यांत पुन्हा मोहीम राबविण्यात येणार आहे.
नगराध्यक्ष श्री. दिलीप गिरप व मुख्याधिकारी श्री. हेमंत किरूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबविण्यात आली. शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविणे, नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करणे या उद्देशाने वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सातत्याने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.













