जुलैमध्ये आलेल्या मोहरातील आंबे ऑक्टोबरमध्येही टिकवले; वीरेन्द्र कांबळी यांचा प्रयोग
देवगड : प्रतिनिधी
देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात आली आहे. देवगड येथील वीरेन्द्र कांबळी यांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या मोहरातील हापूस आंबे जतन करून त्यांची सहा डझनांची पेटी वाशी मार्केटमध्ये पाठवली आहे. हंगामा आधी देवगड हापूस आंबे बाजारात दाखल झाल्याने या पेटीला लिलावात किती दर मिळतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
वीरेन्द्र कांबळी यांनी हे आंबे वाशी मार्केटमधील दलाल सु. की.पुंडे यांच्याकडे पाठवले आहेत. वाशी मार्केटमध्ये आंब्यांचा लिलाव होणार असल्याने पेटीला नेमका किती दर मिळेल, याचा अंदाज आताच सांगता येणार नसल्याचे कांबळी यांनी स्पष्ट केले.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंब्याला मोहर आल्यानंतर कांबळी यांनी आंबे टिकवून ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली. आंब्यांना कागदाचे वेष्टण घालून त्यावर प्लास्टिक कव्हरचा वापर करण्यात आला. पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी ही काळजी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या आंब्यांसाठी केवळ बुरशीनाशकाची फवारणी करण्यात आली असून, अन्य कोणत्याही कीटकनाशकांचा वापर केलेला नसल्याचे कांबळी यांनी स्पष्ट केले. योग्य निगा आणि संरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी जुलैमध्ये आलेल्या मोहरातील हापूस आंबे ऑक्टोबर महिन्यापर्यंत टिकवून ठेवले आहेत.
देवगड हापूस आंब्याची चव आणि दर्जा यामुळे या आंब्याला बाजारपेठेत विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत हंगामाबाहेर वाशी मार्केटमध्ये दाखल झालेल्या या सहा डझन आंब्यांच्या पेटीला किती दर मिळतो, याकडे आंबा उत्पादकांचे लक्ष लागले आहे. लिलावानंतर या पेटीतून मिळणारे उत्पन्न स्पष्ट होणार आहे.














