गोवळकोट-पेठमापमधील मचूळ पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा पुढाकार!

 ग्रॅव्हिटी पाणी योजनेची प्रत्यक्ष पाहणी; स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजनांवर भर

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहरातील गोवळकोट आणि माप परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मचूळ पाण्याच्या समस्येची दखल घेत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नगराध्यक्ष सकपाळ यांनी संबंधित अधिकारी, पाणी योजनेचे ठेकेदार आणि स्थानिक नागरिकांसमवेत प्रत्यक्ष परिसराची पाहणी केली. यावेळी ग्रॅव्हिटी पाणी योजनेच्या माध्यमातून या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गोवळकोट आणि पेठमाप परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठ्यादरम्यान मचूळ पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आणि आरोग्याशी निगडित असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेत उपाययोजनांच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
या पाहणीवेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, संबंधित नगरसेवक, चिपळूण नगरपालिकेचे अधिकारी, ग्रॅव्हिटी पाणी योजनेचे ठेकेदार तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी परिसरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, नागरिकांना जाणवणाऱ्या अडचणी आणि मचूळ पाण्याच्या समस्येमागील संभाव्य कारणांचा आढावा घेण्यात आला. ग्रॅव्हिटी पाणी योजनेच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून गोवळकोट व पेठमाप परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या कशा पद्धतीने सोडविता येईल, याबाबत विविध उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला. नागरिकांना स्वच्छ, शुद्ध आणि नियमित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक बाबी तपासून कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. पाण्यासारख्या मूलभूत सुविधेबाबत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता भविष्यातही ही समस्या उद्भवणार नाही, अशा स्वरूपाचा कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने नगराध्यक्षांनी या पाहणीद्वारे प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून उपाययोजना करण्याची भूमिका नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी घेतली आहे. त्यामुळे गोवळकोट आणि पेठमाप परिसरातील मचूळ पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा मिळणे हा प्राधान्याचा विषय असून, गोवळकोट व माप भागातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी भूमिका नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी घेतली आहे.