भिंगळोली येथे ७ व ८ नोव्हेंबरला भव्य अंडरआर्म बॉक्स नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

गुड मॉर्निंग क्लबचा पुढाकार; प्रथम क्रमांकासाठी ७ हजार, तर द्वितीय क्रमांकासाठी ५ हजारांचे पारितोषिक

मंडणगड प्रतिनिधी : क्रीडाप्रेमी तरुणांना आपले क्रिकेट कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी आणि रात्रीच्या प्रकाशझोतात क्रिकेटचा थरार अनुभवता यावा, या उद्देशाने गुड मॉर्निंग क्लब, मंडणगड यांच्या वतीने ७ व ८ नोव्हेंबर २०२६ रोजी भिंगळोली येथील तहसिल कार्यालयाचे समोरील मैदानात भव्य अंडरआर्म बॉक्स नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला रोख ७ हजार रुपये व आकर्षक चषक, तर द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या संघाला रोख ५ हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी ९०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या दिवशी गाव व गाव संघांसाठी सामने खेळविण्यात येणार असून, दुसऱ्या दिवशी खुल्या गटातील (ओपन) सामने आयोजित करण्यात येणार आहेत. एका संघात सहा खेळाडूंचा समावेश असेल. प्रत्येक सामना तीन षटकांचा राहणार असून, सामने रात्री ठीक ८ वाजता सुरू होतील. पंचांचा निर्णय अंतिम राहील, तसेच उर्वरित नियम मैदानावर जाहीर करण्यात येणार आहेत. परिसरातील क्रिकेटप्रेमी, युवक आणि क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन गुड मॉर्निंग क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व संघ नोंदणीसाठी आयोजक अजय खैरे, सूरज कदम, निलेश जाधव, जितेंद्र सिंह गोरे आणि राहुल परदेशी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रात्रीच्या अंधारात कृत्रिम दिव्यांचे प्रकाशझोतात रंगणाऱ्या या क्रिकेट सामन्यांमुळे मंडणगडमध्ये क्रीडाप्रेमींसाठी दोन दिवस क्रिकेटचा रोमांच अनुभवायला मिळणार आहे.