विरोधकांच्या खोट्या दाव्यांची उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याकडून चिरफाड!

जनतेची दिशाभूल आणि मालवणच्या विकासातील अडथळे खपवून घेणार नाही

नगरपरिषदेची बदनामी करणाऱ्या उबाठा गटाला जशास तसे उत्तर मिळणार

नळपाणी योजनेसह सर्व विकासप्रकल्प दर्जेदार व गतिमान पद्धतीने पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध

मालवण | प्रतिनिधी : नव्या नळपाणी योजनेसह मालवण शहरातील विकासकामांबाबत विरोधकांकडून करण्यात येणारे आरोप तथ्यहीन असून, केवळ राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप मालवण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती दीपक पाटकर यांनी केला आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध असून, विकासकामांमध्ये राजकीय हेतूने अडथळे निर्माण करण्याचे उबाठा गटाचे प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला वस्तुस्थितीच्या आधारे पोलखोल होतच राहणार. असा इशाराही पाटकर यांनी दिला आहे.

नळपाणी योजनेच्या कामावर केवळ आक्षेप नोंदवणे आणि काम कसे रखडणार हे पाहणे हेच उबाठा गटाचे काम आहे. प्रशासकीय वरिष्ठ स्तरावरून मिळणाऱ्या मान्यता व नियमानुसारच दर्जेदार काम सुरु आहे. कामाचा दर्जा वापरले जाणारे पाईप हे योग्य दर्जाचे आहेत. बांधन्यात येणाऱ्या टाक्या ही प्राप्त मंजुरी नंतरच होणार आहेत. असे असताना केवळ दिशाभूल करणारे राजकारण उबाठा गट करतं आहे. मात्र जनतेला सर्व समजले असून विकास शिवसेना महायुतीच्याच माध्यमातून होणार हा जनतेचा विश्वास आहे

मालवण शहरातील नळपाणी योजना ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाची योजना आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला पुरेशा दाबाने आणि मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहे. नळपाणी योजनेसह शहरातील अन्य विकासप्रकल्प दर्जेदार, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण करण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. मात्र, विकासकामांबाबत संभ्रम निर्माण करून नागरिकांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न उबाठा गटाकडून होत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला.

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मालवण शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित विकासकामांना गती देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मालवण शहराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास हेच नगराध्यक्षा व आम्हा सर्व नगरसेवक यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विकासकामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही पाटकर यांनी स्पष्ट केले.

विरोधकांनी विकासकामांवर विधायक टीका जरूर करावी. मात्र, कोणतीही ठोस माहिती न घेता आरोप करणे आणि नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करणे म्हणजे शहर विकासाला अडथळा करणे होय. राजकीय आरोपांपेक्षा मालवण शहराचा विकास आणि नागरिकांचे हित महत्त्वाचे आहे.

शहर विकास हाच आमचा ध्यास असून विकासकामांसाठी आम्ही सदैव तयार आहोत. विकासाच्या आड येणाऱ्या प्रत्येक आरोपाला योग्य वेळी ठोस उत्तर दिले जाईल, असे पाटकर यांनी सांगितले.

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण शहराच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी शिवसेना महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी एकजुटीने कार्यरत आहेत. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणे, प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि शहरातील विकासप्रकल्प वेळेत पूर्ण करणे हीच आमची बांधिलकी आहे. विरोधकांच्या आरोपांमुळे विकासाची गती थांबणार नाही, असेही उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी स्पष्ट केले.