पाचल (वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील सौंदळ येथील अर्जुना नदीच्या पात्रात एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह रविवारी सकाळी मिळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौंदळ येथील कोंड परिसरातील राजू सातकुट यांच्या आंब्याच्या बागेजवळ वाहणाऱ्या अर्जुना नदीच्या पाण्यात एका अनोळखी पुरुषाचे प्रेत तरंगताना आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पाटील समृद्धी सिद्धांत पाटील (वय ३२, रा. पाटीवाडी सौंदळ) यांनी राजापूर पोलिसांना खबर दिली. मृतदेहाच्या अंगात चॉकलेटी रंगाची हाफ पँट असून नदीच्या पाण्यात राहिल्यामुळे चेहरा, तोंड आणि संपूर्ण शरीर फुगून पांढरट-लालसर झाले होते, तसेच प्रेत कुजल्याने दुर्गंधी सुटलेली होती. पाण्यात बुडाल्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलीस हवालदार गुरुप्रसाद महाडीक यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अपमृत्यू क्रमांक ६९/२०२६ अशी नोंद केली आहे. राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख या प्रकरणाचा पुढील तपास करत असून संबंधित मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.












