नांदगाव गोसावीवाडी शाळेतील चिमुकल्यांनी साकारला शिवरायांचा गड!

 विद्यार्थ्यांच्या कलाकृतीने ग्रामस्थांचे वेधले लक्ष

चिपळूण (प्रतिनिधी) : दिवाळीचा सण जवळ येताच सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण होते. दिवाळीच्या सुट्टीत किल्ले उभारण्याची परंपरा आजही बालमनाला भुरळ घालत असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि गडकिल्ल्यांच्या इतिहासाची ओळख नव्या पिढीला करून देणारा हा उपक्रम ग्रामीण भागातील शाळांमध्येही उत्साहाने राबविला जात आहे. याच परंपरेचे सुंदर दर्शन चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नांदगाव गोसावीवाडी येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घडवून आणले आहे. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून साकारलेला शिवरायांचा किल्ला सध्या ग्रामस्थांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
शाळेच्या आवारात दगड, माती आणि चिखल यांचा वापर करून विद्यार्थ्यांनी किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती उभारली आहे. केवळ किल्ला बांधण्यापुरताच हा उपक्रम मर्यादित न ठेवता त्याला रंगरंगोटी करून, भगवे ध्वज लावून तसेच मावळ्यांच्या प्रतिकृतींची मांडणी करून विद्यार्थ्यांनी गडाचे हुबेहूब स्वरूप साकारले आहे. चिमुकल्या हातांनी उभारलेल्या या गडातून विद्यार्थ्यांची कल्पकता, कलात्मकता आणि शिवरायांविषयी असलेली आत्मीयता प्रकर्षाने दिसून येत आहे. या उपक्रमात सान्वी संतोष कदम (इयत्ता दुसरी), अनिशा राकेश शेडेकर (इयत्ता चौथी), खुशी गणेश लाड (इयत्ता चौथी), विहान संतोष कदम (इयत्ता चौथी) आणि रुद्र नितीन कदम (इयत्ता चौथी) या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. शिक्षक जगदीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे हा किल्ला साकारला.
या कामात अंगणवाडी सेविका साक्षी विजय जाधव, मदतनीस कल्पना काशिराम कांबळे तसेच माजी विद्यार्थी राजू लाड यांनीही मोलाचे सहकार्य केले. विशेष म्हणजे, किल्ला उभारताना विद्यार्थ्यांना केवळ बांधकामाचा आनंद मिळाला नाही, तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गडकिल्ल्यांचे महत्त्व, स्वराज्याची संकल्पना आणि मावळ्यांच्या शौर्याची माहितीही मिळाली. प्रत्यक्ष कृतीतून इतिहासाची ओळख करून देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि सर्जनशीलतेत भर घालणारा ठरला आहे.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि टीव्हीच्या विश्वात रमणाऱ्या बालकांना आपल्या ऐतिहासिक वारसाची ओळख करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम अशा उपक्रमांतून होत आहे. विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रयत्नांतून साकारलेल्या या गडाचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक होत असून, नांदगाव गोसावीवाडीच्या या चिमुकल्या शिवभक्तांनी आपल्या कलाकृतीतून शिवरायांच्या इतिहासाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे.