द स्पाईन फाउंडेशन व कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचा संयुक्त उपक्रम
ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ज्ञांकडून तपासणीचा लाभ
कणकवली : ग्रामीण भागातील नागरिकांना मणक्याच्या आजारांबाबत योग्य वैद्यकीय मार्गदर्शन आणि तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने द स्पाईन फाउंडेशन आणि कणकवली उपजिल्हा रुग्णालय (SDH) यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, शनिवार दि. १४ नोव्हेंबर रोजी मणक्याच्या आजारांचे मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे होणार आहे.
या शिबिरामध्ये मणक्याचे विकार, पाठदुखी, कंबरदुखी तसेच मानदुखी यांसारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. मणक्याशी संबंधित आजारांची लक्षणे, त्यावरील उपचार आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन याबाबत रुग्णांना या शिबिरातून माहिती मिळणार आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी किंवा मानदुखीचा त्रास असलेल्या नागरिकांनी उद्या होणाऱ्या या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












