बुवा संदीप लोके यांचा गजरातुन आर्त हुंकार!

भजन ही केवळ भक्तीची अभिव्यक्ती नाही, तर समाजमनाला जागे करणारी लोकजागृतीची प्रभावी चळवळ आहे. ईश्वराच्या नामस्मरणा बरोबर भजनात समाजातील वास्तव मांडता येते, निसर्गाची वेदना व्यक्त करता येते आणि माणसाला माणुसकीची जाणीव करून देता येते. याच विचारधारेतून साकारलेले ‘माझ्या कोकणाचा रंग बदलला’ हा गजर केवळ भक्तिरचना न राहता कोकणच्या बदलत्या पर्यावरणाचे, निसर्गाच्या ऱ्हासाचे आणि पाण्याच्या टंचाईचे वास्तव अधोरेखित करणारा प्रबोधनात्मक आविष्कार ठरतो.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, हिरव्यागार डोंगररांगांनी नटलेला,आंबा-काजू-फणसाच्या बागांनी समृद्ध असलेला कोकण एकेकाळी निसर्गसंपन्नतेचे प्रतीक होता. पावसाच्या सरींनी चिंब भिजणारी माती, डोंगरातून वाहणारे झरे, खळखळणाऱ्या नद्या आणि हिरवाईने सजलेली शेती हे कोकणचे वैभव होते. मात्र आज बदलते हवामान, विकासाच्या नावाखाली केलेली वृक्षतोड, निसर्गातील वाढता मानवी हस्तक्षेपामुळे काही भागांत आतापासूनच पाणीटंचाईचे संकट जाणवू लागले आहे.
या गजरातून लोके बुवा यांनी विठ्ठलाच्या नामघोषात कोकणच्या पर्यावरणाची चिंता व्यक्त केली आहे. हीच लोककलेची खरी ताकद आहे. कारण लोककला ही केवळ मनोरंजनासाठी नसते; ती समाजाचे प्रतिबिंब असते, समाजाला दिशा देणारी असते आणि काळाच्या प्रश्नांना वाचा फोडणारी असते.झोपलेल्या सरकारला जागे करण्याची धमक जशी लोककलेत असते तशी सर्व सामान्य माणसाची व्यथा हि याच लोककलेचा आधार घेऊन मांडता येते.
फक्त त्या साठी भजनीबुवा हा केवळ भजनी बुवा असुन चालत नाही तर तो संवेदनशील माणूस असला तर पोटातले गित ओठावर येते आणि परिवर्तनाची नवी वाट सापडते..
आज कोकणला केवळ पावसाची नव्हे, तर पाण्याचे महत्त्व ओळखणाऱ्या माणसांची गरज आहे. विठ्ठलाच्या गजरात दुष्काळाची वेदने सोबत
कोकणाची निसर्गसंपन्नता, सांस्कृतिक परंपरा, संतविचार, बदलते सामाजिक वास्तव आणि यातुन कोकणी माणसाला जागे करण्याचा प्रयत्न करणारा हा गजर प्रबोधनात्माक तर आहेच त्याबरोबर अंतर्मुख करणारा आहे.
लोके बुवा यांचा हा गजर एका महत्त्वाच्या गोष्टीची जाणीव करून देते. भजनी बुवा हा केवळ भक्तिरचना करणारा नसतो, तर तो समाजाच्या वेदना ओळखणारा आणि त्या वेदनांना सुरांचा आवाज देणारा संवेदनशील भाष्यकारही असतो.
विठ्ठलाच्या भक्तीत रंगलेले हात जर निसर्गाच्या संवर्धनासाठी पुढे आले, तर कोकणचा हरवलेला हिरवा रंग पुन्हा खुलू शकतो. भजनाच्या टाळ-मृदंगातून हरिनामाचा गजरा सोबत जलसंवर्धनाचा संदेशही घुमला तर पाण्याचे महत्त्व सर्व सामान्य माणसाला कळू शकते
‘विठ्ठल मंदिरात भेटेलच; पण कोकणचा विठ्ठल वाचवायचा असेल, तर त्याच्या निसर्गाची, पाण्याची आणि मातीची काळजी घ्यावी लागेल!
लोके बुवा यांच्या सर्जनशील लेखणीला सलाम! कारण त्यांनी विठ्ठलाच्या भक्तीतून कोकणच्या मातीची व्यथा मांडली आहे.
भजनात विठ्ठल असावा, शब्दांत समाजाचे भान असावे आणि सुरांतून परिवर्तनाचा हुंकार उमटावा, हीच या रचनेची खरी सार्थकता अशा या गजरात पखवाज वादन योगेश सामंत
तबला वादन संदेश सुतार तर
कोरस म्हणून गुरू घाडी, गणेश परब,
रुपेश गायकवाड, सचिन तोडणकर, गुरू पुजारे, सुशील लोके, अजित सावंत, दिगंबर नवलु, अनिकेत नवलु राजेश मोंडे यानी साथ केली आहे
शब्दांकन
प्रा वैभव खानोलकर
सिंधुदुर्ग












