वीरा वारंगची जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी!

तीन गटांत दमदार कामगिरी करत दोन विजेतेपदांसह एक उपविजेतेपद

पुरुष एकेरीत चंद्रकांत साळवे विजेता

मालवण | प्रतिनिधी : इंडियन ऑइल पुरस्कृत महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन, जिल्हा सिंधुदुर्ग आणि मालवण टेबल टेनिस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा मालवण येथे उत्साहात पार पडली. १४ व १५ नोव्हेंबर रोजी जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या श्रीमती सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत विविध वयोगटांतील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

या स्पर्धेत वीरा वारंग हिने विशेष चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने ११/१३ वर्षांखालील मुलींच्या गटात तसेच खुल्या महिला एकेरी गटात विजेतेपद पटकावले. याशिवाय १५/१७ वर्षांखालील मुलींच्या गटात उपविजेतेपद मिळवत दोन विजेतेपदांसह एक उपविजेतेपद आपल्या नावावर केले. खुल्या पुरुष एकेरी गटात चंद्रकांत साळवे यांनी विजेतेपद पटकावले, तर राजाराम वालावलकर उपविजेते ठरले.

स्पर्धेचा गटनिहाय निकाल

११/१३ वर्षांखालील मुलींच्या गटात वीरा वारंग विजेती, तर धनश्री परब उपविजेती ठरली. मुलांच्या गटात नाहुश पारगावकर याने विजेतेपद, तर श्री सारंग याने उपविजेतेपद पटकावले.

१५/१७ वर्षांखालील मुलींच्या गटात वर्षा परुळेकर विजेती, तर वीरा वारंग उपविजेती ठरली. मुलांच्या गटात लौकिक तळवडेकर विजेता, तर योगेश परुळेकर उपविजेता ठरला.

खुल्या महिला एकेरी गटात वीरा वारंग हिने विजेतेपद पटकावले, तर वर्षा परुळेकर उपविजेती ठरली. पुरुष एकेरी गटात चंद्रकांत साळवे विजेते, तर राजाराम वालावलकर उपविजेते ठरले. मिश्र दुहेरी गटात गणेश भट व लौकिक तळवडेकर या जोडीने विजेतेपद पटकावले, तर वर्षा परुळेकर व चंद्रकांत साळवे या जोडीला उपविजेतेपद मिळाले.

विजेत्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महासिंधू टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष विष्णू कोरगांवकर, सचिव हेमंत वालकर, कोषाध्यक्ष नितीन तळेकर, विश्वस्त शुभम मुळीक आणि उद्योजक दिलीप हुनारी, विलास परुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्रे, चषक आणि रोख पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.

यावेळी बालवयोगटातील श्लोक हुनारी, परिन अमरे, रुही कांबळी आणि सृष्टी सुकाळे यांचा विशेष खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विलास परुळेकर आणि क्षितिज हुनारी यांनी विशेष परिश्रम घेतले. पंच म्हणून योगेश परुळेकर, क्षितिज हुनारी, पावनी मालणकर आणि प्रतिभा परुळेकर यांनी जबाबदारी पार पाडली. सामन्यांच्या संयोजनाची जबाबदारी हेमंत वालकर यांनी सांभाळली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महासिंधू टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष विष्णू कोरगांवकर यांनी मालवण एज्युकेशन सोसायटी, जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल, सर्व खेळाडू, पंच, पदाधिकारी आणि सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानले. तसेच स्पर्धेला प्रायोजकत्व दिल्याबद्दल इंडियन ऑइलप्रति कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी केले.