पालखी मिरवणूक अन् दशावतार नाट्यप्रयोगाची रंगत!

सावंतवाडी : कोलगाव येथील ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव 26 नोव्हेंबर रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जत्रोत्सवानिमित्त मंदिराला फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. सकाळी सातेरी देवतांची पूजा झाल्यानंतर श्री सातेरी देवीची आकर्षक स्वरूपात पुष्पपूजा करण्यात येईल. दुपारी मानाचे नैवेद्य अर्पण करण्यात येणार असून, सकाळपासून ओटी भरण्याचा कार्यक्रमही सुरू राहणार आहे. रात्री १२ वाजता मंदिराभोवती ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री १ वाजता पार्सेकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या वार्षिक जत्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे कोलगावसह परिसरातील भाविकांमध्ये जत्रोत्सवाबाबत उत्साहाचे वातावरण आहे.













