गुहागर प्रतिनिधी :
तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शृंगारतळी गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर-चिपळूण संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी गुहागरचे तहसीलदार परिक्षीत पाटील यांची भेट घेऊन विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी गुहागर तालुक्यातील पिकांचे झालेले नुकसान, खालावलेली पाणीपातळी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच आगामी काळात निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी याबाबत चर्चा करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर योग्य उपाययोजना प्रेमकराव्यात आणि आवश्यक ती मदत लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, तालुका सचिव प्रशांत साठले, उपतालुकाध्यक्ष स्वप्निल जाधव, उपतालुकाध्यक्ष अमित खांडेकर, माजी शहराध्यक्ष नवनाथ साखरकर, गुहागर शहराध्यक्ष अभिजीत रायकर, सांस्कृतिक विभाग राहुल जाधव, तसेच इतर मनसे पदाधिकारी, मनसैनिक आणि ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद शिर्के उपस्थित होते.











