परदेशी जहाजाच्या क्लिअरन्ससाठी लाच; लाचखोर बंदरअधिकारी सह दोघांना पोलिस कोठडी

रत्नागिरी : प्रतिनिधी
परदेशी जहाजाला पोर्ट क्लिअरन्स सर्टिफिकेट आणि आवश्यक चाचण्यांची परवानगी देण्यासाठी तब्बल 80 हजारांच्या लाचेची मागणी करत पहिला हफ्ता म्हणून 60 हजार रुपये आपल्या पंटरमार्फत स्विकारणाऱ्या बंदर अधिकाऱ्याला व त्‍याच्या पंटरला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
संदीप विलासराव भुजबळ असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या प्रादेशिक बंदर अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या एजन्सीने एका नादुरुस्त परदेशी जहाजाची दुरुस्ती पूर्ण केली होती. या जहाजाची समुद्रात चाचणी (सी ट्रायल) घेण्याची परवानगी देण्यासाठी आणि जहाजाला पोर्ट क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी या प्रादेशिक बंदर अधिकाऱ्याने 80 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. एकूण 80 हजारांच्या लाचेपैकी 60 हजार रुपयांचा पहिला हप्ता खासगी इसम मिलिंद तुकाराम बनप (53,रा.घाणेकर आळी,रत्‍नागिरी) याने स्विकारली होती. या दोघांनाही लाचलुचपत विभागाच्या शाखेने ताब्यात घेउन न्यायालयात हजर केले असता दोघांनाही 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.