खेड : खेड तालुक्यातील कोष्टी आळी परिसरात राहत्या घराच्या जवळील मैदानावर खेळण्यासाठी जात असताना एका लहान मुलावर लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. तेजस उपेंद्र घोडे असे जखमी मुलाचे नाव असून, तो २० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घराशेजारील मैदानात खेळायला जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात बुरखाधारी महिलेने त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली. या हल्ल्यात तेजस जखमी होऊन खाली कोसळला. त्याच दरम्यान फिर्यादी यांचा मोठा मुलगा ओम हा मैदानाकडे जात असताना त्याला तेजस मैदानात पडलेला दिसला. ओमने जोरात आरडाओरडा केल्यानंतर तेथे असलेल्या अज्ञात बुरखाधारी महिलेने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













