‘अपरांत’ आणि ‘देवभूमी’ उपक्रमांचे विशेष कौतुक
वाचनसंस्कृती जपण्याच्या प्रयत्नांचाही गौरव
कणकवली | मयुर ठाकूर : दैनिक प्रहारने पत्रकारितेबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जतन करण्याचे मोलाचे कार्य केले आहे, असे गौरवोद्गार कणकवलीतील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उमेश सावंत यांनी काढले. दैनिक प्रहारच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त कणकवलीतील ज्येष्ठ विधिज्ञांनी प्रहार परिवाराला शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी कणकवलीतील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. राजेंद्र रावराणे, अॅड. उमेश सावंत, अॅड. विलास परब, अॅड. दीपक अंधारी, अॅड. अंजली मुतालीक तसेच कणकवली तालुका बार असोसिएशनचे तालुकाध्यक्ष अॅड. राजू परुळेकर यांनी प्रहार परिवाराला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर, संतोष राऊळ, किशोर राणे, परेश पेडणेकर, माणिक सावंत, मिलिंद पारकर, प्रतीक्षा जोशी, मारुती घाडी आणि मयूर ठाकूर आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, सध्याच्या मोबाईल, ऑनलाइन बातम्या आणि टेलिव्हिजनच्या युगात वाचनसंस्कृती टिकवणे आणि वृत्तपत्र समूह चालवणे ही अत्यंत कठीण गोष्ट झाली आहे. अशा परिस्थितीत प्रहारने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत आपले जाळे विस्तारत पत्रकारितेची परंपरा दिमाखात सुरू ठेवली आहे. दिवसेंदिवस या समूहाशी चांगले लेखक जोडले जात असून विषयांची व्याप्तीही वाढत आहे. ज्येष्ठ लेखक मधुकर भावे यांच्यापासून सुरू झालेली लेखनाची परंपरा आजही विविध लेखकांच्या माध्यमातून पुढे जात आहे. प्रहारची रविवारची पुरवणी वाचनीय असून, समूहाचे विविध उपक्रमही उल्लेखनीय आहेत.
‘अपरांत’ आणि ‘देवभूमी’ या विशेष उपक्रमांचा उल्लेख करताना अॅड. सावंत यांनी या उपक्रमांमधून जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे महत्त्वपूर्ण दस्तऐवजीकरण होत असल्याचे नमूद केले. विशेषतः ‘देवभूमी’च्या माध्यमातून जिल्ह्यातील देवस्थानांचा इतिहास, परंपरा, गावरहाटी आणि धार्मिक-सांस्कृतिक महत्त्व पुढील पिढ्यांसाठी संकलित करण्याचे काम झाले आहे. अनेक देवस्थानांचा इतिहास आजही केवळ मौखिक स्वरूपात सांगितला जातो. अशा वेळी प्रहारने केलेले संशोधनात्मक लेखन आणि संकलन भविष्यात महत्त्वाचे ठरणार आहे. देवस्थानांसंदर्भातील न्यायालयीन प्रकरणांमध्येही अशा ऐतिहासिक नोंदी संदर्भसामग्री म्हणून उपयुक्त ठरू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील देवस्थानांचा समावेश करताना स्थानिकांच्या भावना, मानपान आणि परंपरा यांचा समतोल राखणे हे मोठे आव्हान असते. मात्र, प्रहारच्या टीमने हे काम अभ्यासपूर्ण पद्धतीने हाताळले आहे. समाजाची नाळ ओळखणाऱ्या आणि समाजात राहून काम करणाऱ्या माणसालाच अशा प्रकारचे वेगळे उपक्रम सुचू शकतात. त्यामुळे प्रहारने केलेले हे कार्य केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित नसून पुढील पिढ्यांसाठी ऐतिहासिक ठेवा जतन करणारे आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात न्यायव्यवस्थेच्या डिजिटलायझेशन, पेपरलेस कामकाज आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या वापराच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे यांच्या प्रयत्नांतून सुरू असलेल्या पायलट प्रोजेक्टची माहिती प्रहारमधील लेखातून प्रभावीपणे मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या लेखाची दखल घेत संबंधित अंक मुंबई उच्च न्यायालयात पाठविण्यासाठी मागविण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
प्रहारच्या या प्रवासात आपल्यालाही लेखनाच्या माध्यमातून योगदान देता आले, याचा आनंद आणि अभिमान असल्याचे सांगत आतापर्यंत प्रहारमध्ये सहा लेख लिहिल्याचे अॅड. सावंत यांनी नमूद केले.
प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान प्रहारच्या वतीने उपस्थितांचे सत्कार करून नव्याने प्रकाशित करण्यात आलेला देवभूमी ग्रंथ भेट स्वरूपात देण्यात आला.













