१० कोटींचा प्रकल्प; प्राथमिक सर्वेक्षणासाठी २३ लाखांचा निधी मंजूर- सुरजराव शिंदे
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरगाव येथे कोल्हापूर पद्धतीचा पहिला बंधारा उभारण्यात येणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बंधाऱ्याच्या प्राथमिक सर्वेक्षणासाठी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, बुधवार दि. १९ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि विंधन विवरे (बोअरिंग) घेण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे शिरगावसह परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
शिरगाव परिसरातील शेतीला सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे आणि शेतीच्या विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने शेतकरी नेते सुरज शिंदे यांनी या बंधाऱ्यासाठी गेल्या वर्षभरापासून सातत्याने प्रयत्न केले. राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांची मंत्रालय स्तरावर वारंवार भेट घेऊन त्यांनी या प्रकल्पाचा पाठपुरावा केला. आ. शेखर निकम यांच्या शिफारस पत्राच्या माध्यमातूनही या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, बंधारा उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. या बंधाऱ्याच्या उभारणीपूर्वी आवश्यक असलेले प्राथमिक सर्वेक्षण, तसेच विंधन विवरे घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी जलसंपदा विभागाचे उपअभियंता विपुल खोत आणि राम वाजे उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्वेक्षणाच्या कामाची पाहणी केली तसेच उपस्थितांशी प्रकल्पासंदर्भात चर्चा केली.
यावेळी शेतकरी नेते सुरज शिंदे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष निलेश शिंदे, प्रगतशील शेतकरी विनायकराव शिंदे, उद्योजक प्रकाश सुर्वे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष नाचरे उपस्थित होते. शिरगावमध्ये साकारण्यात येणारा हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा भविष्यात परिसरातील शेतीसाठी वरदान ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यामुळे बंधाऱ्याच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाकडे आता शिरगाव परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.













