दापोली:
दापोली एसटी महामंडळाच्या भोंगळ आणि मनमानी कारभारामुळे मुरूडमधील विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप समोर आला आहे. दापोली-मुरूड-कर्दे मार्गावरील बस दररोज उशिरा येत असल्याने कर्दे गावातून मुरूड हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींचे शाळेतील सुरुवातीचे महत्त्वाचे तास बुडत आहेत. याबाबत मुरूडमधील जागरूक नागरिक उमेश फडके यांनी एसटी प्रशासनाकडे तक्रार केली असून, प्रश्न न सुटल्यास विद्यार्थिनींसह आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, मुरूड दुर्गादेवी मंदिरापर्यंत बस न आणता परस्पर कर्दे किंवा दापोलीकडे वळवली जात असल्याने प्रवाशांनाही मनमानी कारभाराचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एसटी प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन बससेवा वेळेत सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.













