आवळेगाव-कुपवडे रस्त्यासाठी साडेचार कोटींचा निधी; कामाचे आमदार निलेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन
निकृष्ट काम केल्यास कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा
स्वप्निल कदम-कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील आवळेगाव ते कुपवडे या ९ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या डांबरीकरण व डागडुजीसाठी तब्बल ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या कामाचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक वर्षांपासून खड्डे आणि दुरवस्थेमुळे त्रस्त असलेल्या ग्रामस्थांची रस्त्याची मागणी आता मार्गी लागणार असल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी बोलताना आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांवर भाष्य केले. २०१३ नंतर या मतदारसंघात विकासकामांची नोंदच झाली नव्हती. डीपीआरच्या नावाखाली तीन वेळा आराखडे बदलून जनतेची दहा वर्षे वाया घालवण्यात आली. मात्र, आता विकासकामे शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. आंब्रड मतदारसंघासाठी आमदार निधीतून ६८ लाख रुपये दिले असून कासारखिंडचा प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मार्चपूर्वी सोनवडे घाट मार्गाचे भूमिपूजन!
सोनवडे घाट मार्गाबाबत महत्त्वाची घोषणा करताना आमदार राणे म्हणाले की, मार्च महिन्यापूर्वी खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सोनवडे घाट मार्गाचे भूमिपूजन करण्यात येईल. तसेच प्रस्तावित अंजीवडे घाट रस्त्याचाही प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निकृष्ट काम केल्यास कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करणार!
रस्त्याचे काम दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची सक्त ताकीद आमदार राणे यांनी कंत्राटदाराला दिली. कामात गुणवत्ता राखली गेली नाही, तर ब्लॅकलिस्ट करण्यास मागेपुढे पाहणार नाही. मात्र, १२ महिन्यांचे काम ११ महिन्यांत दर्जेदार पूर्ण केल्यास संबंधित कंत्राटदाराचा जाहीर सत्कार करू, असेही त्यांनी सांगितले. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी थेट जाब विचारावा. आपण कोणत्याही कंत्राटदारासोबत गुप्त बैठका घेणारा आमदार नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.
*माणगाव खोऱ्यातील ५०० ते ६०० कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार : दत्ता सामंत*
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या कामकाजाचे कौतुक करत २०२४ मध्ये आमदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघाला विधिमंडळात ओळख मिळवून दिल्याचे सांगितले. १९९० पासून आंब्रड मतदारसंघ राणे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आमदार राणे यांच्या कार्यशैलीमुळे माणगाव खोऱ्यातील तसेच उबाठा गटातील सुमारे ५०० ते ६०० कार्यकर्ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी केला. गावातील विकासकामे शाखाप्रमुखांच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद सदस्या दीपलक्ष्मी पडते यांनी मागील दहा वर्षांच्या तुलनेत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मतदारसंघाला मिळाल्याचे सांगितले. जांभवडे येथील तीन किलोमीटरचा रस्ताही पूर्ण झाल्याचे त्यांनी नमूद केले. आंब्रडगाव नेहमीच राणे कुटुंबीयांच्या पाठीशी राहिले असून पंचक्रोशीच्या विकासासाठी विविध मागण्या त्यांनी मांडल्या.
कुपवडे सरपंच दिलीप तवटे यांनी आमदार राणे यांचे आभार मानताना गेल्या दहा वर्षांपासून थांबलेली विकासकामे पुन्हा सुरू झाल्याने कुपवडे गावाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जांभवडे सरपंच अमित मडव यांनी केले.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सावंतवाडी जिल्हाप्रमुख संजू परब, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, नागेश आईर, पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर, देवेंद्र नाईक, कुपवडे सरपंच दिलीप तवटे, जांभवडे सरपंच अमित मडव, घोटगे सरपंच चैताली ढवळ आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













