घरकुल लाभार्थ्यांना संविधानाची प्रतिमा भेट;
प्रत्येक घरात संविधान पोहोचविण्याचा सरपंच नरेंद्र कोलते यांचा संकल्प
वैभववाडी प्रतिनिधी :
करूळ ग्रामपंचायतीच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ग्रामपंचायतीमार्फत घरकुल लाभार्थ्यांना भारतीय संविधानाची प्रतिमा भेट देण्यात आली.
यावेळी बोलताना सरपंच नरेंद्र कोलते म्हणाले की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. संविधान हे केवळ पुस्तक नसून प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे आणि कर्तव्यांचे मार्गदर्शक आहे. घरकुल लाभार्थ्यांनी संविधानाची प्रतिमा आपल्या घरातील मुख्य हॉलमध्ये लावावी, जेणेकरून संविधानातील मूल्यांची जाणीव प्रत्येकाला कायम राहील. तसेच लवकरच करूळ गावातील प्रत्येक घराघरात भारतीय संविधानाची प्रत पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच भास्कर सावंत, पोलीस कर्मचारी हरीश जायभाय, पोलीस कर्मचारी रणजित सावंत, पोलीस पाटील उदय कदम, ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव तसेच ग्रामस्थ व घरकुल लाभार्थी उपस्थित होते.












