खात्यातून तीन वेळा रक्कम लंपास ; पोर्टलवरील तक्रारीनुसार पोलिसांचा तपास
सावंतवाडी : शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचे कार्ड मशिनमध्ये अडकल्यानंतर, ते बाहेर काढून देण्याच्या बहाण्याने मदत करत अज्ञात भामट्यांनी तिच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाला वेग दिला आहे.
संबंधित महिला शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शेजारील एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेली होती. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तिचे एटीएम कार्ड मशिनमध्येच अडकून राहिले. याच संधीचा फायदा घेत बाजूला उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने मदतीचा बहाणा करत कार्ड बाहेर काढून देण्याचा प्रयत्न केला. कार्ड निघत नसल्याने महिलेने एटीएम मशिनवर चिकटवलेल्या कागदावरील हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला. समोरील व्यक्तीने ‘एंटर’ आणि ‘कॅन्सल’ बटण दाबून पासवर्ड टाकण्यास सांगितले.
मात्र तरीही कार्ड बाहेर आले नाही. यावेळी फोनवरील व्यक्तीने तांत्रिक बिघाडाचे कारण देत दुसऱ्या दिवशी इंजिनिअर येऊन कार्ड काढून देईल व तुमचे पैसे सुरक्षित राहतील, असा विश्वास देऊन महिलेची दिशाभूल केली. हा प्रकार तेथील सुरक्षा रक्षकाच्या कानावर घालून महिला घरी परतली.
घरी गेल्यानंतर महिलेने मोबाईलवर खात्यातील शिल्लक तपासली असता तिच्या खात्यात केवळ ४६ रुपये शिल्लक असल्याचे पाहून तिला धक्का बसला. दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन स्टेटमेंट तपासले असता तिच्या खात्यातून तीन वेळा परस्पर रक्कम काढली गेल्याचे स्पष्ट झाले. भामट्यांनी आपले मूळ कार्ड मशिनमधून काढून घेतले आणि त्याजागी दुसरेच कार्ड अडकवून ठेवले होते, असा संशय महिलेने व्यक्त केला आहे.
या फसवणुकीप्रकरणी अज्ञात व्यक्ती व फोनवरून दिशाभूल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून गेलेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी महिलेने केली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील अधिक तपास करत आहेत.











