माडखोल । लखन आडेलकर : सावंतवाडी तालुक्यातील
माडखोल गावचे ग्रामदैवत श्री देवी पावणाई मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार, ४ डिसेंबर २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे. उत्पत्ती एकादशीच्या पावन पर्वावर आयोजित करण्यात आलेल्या या जत्रोत्सवात दिवसभर विविध धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
जत्रोत्सवाच्या दिवशी पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात होणार असून, सकाळी श्री देवी पावणाईची विधिवत पूजा-अर्चा करण्यात येईल. यानंतर भाविकांसाठी देवीच्या ओट्या भरणे आणि नवस फेडणे आदी पारंपरिक विधी पार पडणार आहेत. संपूर्ण दिवसभर परिसरातील भाविकांची दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी होणार असून त्यादृष्टीने देवस्थान समितीने आवश्यक नियोजन केले आहे.
रात्रीच्या सत्रात श्री देवी पावणाई, श्री देव रवळनाथ आणि श्री देवी काळकाई यांचा भव्य पालखी सोहळा ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात निघणार आहे.
हा पालखी सोहळा जत्रोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे. पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर भाविकांच्या मनोरंजनासाठी व पारंपरिक लोककलेचा वारसा जपण्यासाठी आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा विशेष दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
माडखोल गावच्या या ऐतिहासिक, धार्मिक आणि पारंपरिक जत्रोत्सवात पंचक्रोशीतील तसेच बाहेरगावी असलेल्या सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री देवी पावणाईचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन माडखोल देवस्थानच्या मानकरी मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.













