कुडाळ । प्रतिनिधी : विद्यार्थी जीवनात नेहमीच मनात प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, त्यासाठी आपण प्रतिभावंत व्यक्तींची पुस्तके वाचली पाहिजेत. ग्रंथालयाची कास धरली पाहिजे. ग्रंथ आपल्याला सशक्त बनवतात, आपण जसा विचार करतो, तसेच आपण पुढे घडतो म्हणून सकारात्मक विचार ठेवा, मोबाईलच्या मोहात पडू नका, आज चांगला माणूस बनणं काळाची गरज आहे, असे मौलिक प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.रुपेश पाटील यांनी साळगाव येथे केले.
शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रा. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष प्रदीप प्रभूतेंडोलकर, सचिव मुकुंद धुरी, संस्था उपाध्यक्ष ज्ञानदेव चव्हाण, संचालक भास्कर परब, रमाकांत धुरी, प्रताप कुडाळकर, झाराप येथील प्रसिध्द उद्योजक व संस्थेचे आश्रयदाते दिलीप प्रभूतेंडोलकर, कोमसापचे भरत गावडे, युवा उद्योजक तुषार माईणकर, विनोद खानोलकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सद्गुरू डिचोलकर, शिक्षक-पालक संघ उपाध्यक्ष वासुदेव मेस्त्री, सामाजिक कार्यकर्ते संजय सामंत, एकनाथ गवस, दिलीप माळकर, सौ. गवस, नारायण मेस्त्री, मुख्याध्यापक सलीम तकीलदार आदि मान्यवर तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रा. रुपेश पाटील पुढे म्हणाले, विजेते तेच होतात जे झपाटलेल्या व्यक्तीसारखे काम करतात, शाळा ही समाजाची प्रतिकृती असते, त्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी, शिक्षणप्रेमी दाते, संस्था यांनी घालून दिलेला वसा कायम ठेवावा, असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.यावेळी चालू शैक्षणिक वर्षात उज्वल यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना पंचक्रोशीतील दाते, संस्था, आजी-माजी शिक्षक तसेच अन्य व्यक्तीनी पुरस्कृत केलेल्या बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चालू वर्षीचे आदर्श विद्यार्थी म्हणून मधुकर पुरलकर, स्वानंदी सामंत, सहदेव धाकोरकर, निकिता पवार यांची तर क्रीडा क्षेत्रातील उदयोन्मुख खेळाडू म्हणून तन्मय राऊळ व सारिका पाटील यांची निवड करण्यात आली तर कै. लाड सर स्मृती प्रित्यर्थ संगीत क्षेत्रातील विशेष योगदान बदल आविष्कार खानोलकर व विभागीय फुटबॉल स्पर्धेत यशस्वी झालेल्या संघाला विशेष पुरस्कार देण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा व फुटबॉल स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूंनाही सन्मानित करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना उद्योजक विनोद खानोलकर यांनी जीवनात जिद्द व चिकाटी असेल तर सर्व गोष्टी सहज होतात, असे सांगतानाच आपले या शाळेला नेहमी सर्वोतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे भरत गावडे यांनी आपण संवेदनशील असलले पाहिजे, मन प्रसन्न ठेवा. चांगले काम करताना लाज बाळगू नका, शाळा हे संस्काराचे केंद्र असते, त्याचे पावित्र्य जपा असे सांगितले,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परीचय मुख्याध्यापक सलीम तकीलदार यांनी केले. सूत्रसंचालन सहा.शिक्षक विद्यानंद पिळणकर यांनी तर बक्षिसाचे वाचन सुप्रिया पेडणेकर यांनी केले व कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन एकनाथ कांबळे यांनी केले.
चौकट :
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि बक्षिसांची उधळण
तब्बल अडीच तासाच्या मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन प्राध्यापक पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद व प्रश्नोत्तरात दाखवलेली हुशारी उपस्थितांना कमालीची समाधानकारक वाटली. म्हणून उपस्थित अनेकां मान्यवरांनी विद्यार्थ्यांवर बक्षिसांची उधळण केली.