वैभववाडी शहरातील अनधिकृत स्टॉलवर लवकरच कारवाई – तहसीलदार दिप्ती देसाई

वैभववाडी शहरातील अनधिकृत स्टॉलवर लवकरच कारवाई – तहसीलदार दिप्ती देसाई

स्टॉल हटावबाबत नगराध्यक्ष व नगरसेवकांनी घेतली तहसीलदारांची भेट

वैभववाडी प्रतिनिधी
शहरातील अनधिकृत स्टॉल तात्काळ हटविण्यात यावेत, या मागणीसाठी वाभवे – वैभववाडी नगरपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार दिप्ती देसाई यांची भेट घेतली. अनधिकृत स्टॉलवर लवकरच कारवाई केली जाईल असे आश्वासन तहसीलदार देसाई यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
वैभववाडी नगरपंचायतीच्या वतीने फेब्रुवारी 2023 मध्ये स्टॉल हटाव मोहीम राबविण्यात आली होती. दरम्यान स्टॉलधारक व नगरपंचायत पदाधिकारी, अधिकारी यांच्यात खडाजंगी झाली होती. नगरपंचायतने आपल्या भुमिकेवर ठाम राहत सर्व स्टॉल हटवले होते. जुन महिन्यात पुन्हा वैभववाडी शहरात स्टॉल लागले. शासकीय गोडावून व इतर ठिकाणी लागलेले स्टॉल हटवण्यात यावेत अशी मागणी देखील नगराध्यक्ष व नगरसेवकांनी केली होती. तरीदेखील स्टॉलची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत होते. बुधवारी एका स्टॉल धारकांने येथील संभाजी चौकात स्टॉल उभारला. त्यामुळे वातावरण पुन्हा तापले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी नगरपंचायतच्या पदाधिकारी यांनी पुन्हा तहसीलदार देसाई यांची भेट घेतली. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, बांधकाम सभापती विवेक रावराणे, नगरसेवक प्रदीप रावराणे, नगरसेवक सुभाष रावराणे, नगरसेविका यामिनी वळवी, सुंदरी निकम, राजन तांबे, संतोष कुडाळकर, रत्नाकर कदम व कार्यकर्ते उपस्थित होते.
नव्याने लागत असलेले स्टॉल लवकरात लवकर हटविण्यात यावेत. लवकरच विकास कामे करण्यात येणार आहेत. विकासकामात सदर स्टॉल अडथळा ठरू शकतात. असे माईणकर व सावंत यांनी सांगितले. शासकीय जागेत लागलेल्या अनधिकृत स्टॉलवर कारवाई केली जाईल असे आश्वासन तहसीलदार देसाई यांनी दिले आहे.