खेड(प्रतिनिधी) खेड न्यायालयात शनिवार ९ सप्टेंबर २०२३ रोजी लोक अदालतचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा न्यायाधीश एक तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर देशपांडे यांनी समितीच्या माध्यमातून सांगितले आहे.
सदरचे लोकन्यायालय हे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश, श्री.व्ही.आर.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. गोसावी यांचे साहाय्याने पार पडत आहे. लोक अदालत मध्ये न्यायालयामध्ये दाखल होऊ शकतील अशी प्रकरणे तसेच न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे यामध्ये दोन्ही बाजूंच्या पक्षकारांकडून तडजोड केली जाते. त्यामध्ये पक्षकारांचा वेळ,पैसा आणि इतर साधनांची बचत होते .तसेच लोक अदालत मध्ये दोन्ही पक्षांना मान्य होईल असा तोडगा काढल्याने,न्यायालयीन प्रकरणांना पूर्णविराम मिळतो, अशी माहिती डॉ सुधीर देशपांडे यांनी दिली.येत्या लोक अदालतच्या माध्यमातून पक्षकारांनी आणि संस्थांनी अधिक अधिक लाभ करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. याबाबतीत अधिक माहितीसाठी खेड तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयात संबंधित लिपिक श्री अपूर्व भुवड यांच्याशी संपर्क साधावा.











