खेड शहरात काल आलेले पूरपाणी आता पूर्णतः ओसरले आहे. नगरपरिषदेमार्फत सकाळपासून स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, परिस्थिती जवळपास पूर्वपदावर आली आहे. शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडण्यास सुरुवात केली आहे आणि जनजीवन हळूहळू पूर्ववत होत आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात काल, 20 जून 2025 रोजी, दिवसभर जोरदार पावसाची नोंद झाली. मंडणगडमध्ये सर्वाधिक 144.75 मिमी पाऊस पडला, तर खेडमध्ये 112.57 मिमी पावसाची नोंद झाली. दापोलीत 73.28 मिमी, चिपळूणमध्ये 40.89 मिमी, गुहागरमध्ये 23.40 मिमी, संगमेश्वरमध्ये 54.16 मिमी, रत्नागिरीत 11.66 मिमी, लांजामध्ये 29.80 मिमी आणि राजापूरमध्ये 25.62 मिमी इतका पाऊस झाला.
जिल्ह्यात एकूण 516.13 मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरी पावसाचे प्रमाण 57.34 मिमी इतके आहे. सुदैवाने पावसाने ओसरण्यास सुरुवात केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे.










