आरएचपी फाउंडेशनतर्फे दिव्यांगांसाठी स्वयंचलन कार्यशाळा

रत्नागिरी : रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक (आरएचपी) फाउंडेशनतर्फे दिव्यांगांसाठी स्वयंचलन कार्यशाळा ३१ डिसेंबर रोजी घेण्यात आली. यामध्ये गरजेप्रमाणे ७ व्हीलचेअर, ५ कमोडचेअर, ८ जेलकुशन आणि मेडीकलकीट या कृत्रिम साधनांचे वाटप करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सादिकभाई नाकाडे यांनी दिली.

अहमदनगर येथील अनामप्रेम संस्थेच्या सहयोगाने आरएचपी फाउंडेशनने पॅराप्लेजिक दिव्यांगांसाठी स्वयंचलन कार्यशाळा शामराव पेजे सभागृहात सकाळी १० ते सायं ५:३० यावेळेत आयोजित केली होती. पाठीच्या मणक्याला इजा होऊन कमरेखालील संवेदना गमावलेल्या दिव्यांगाना स्वत:च्या सर्व गोष्टी कशा करुन स्वावलंबी होऊन इतरांच्या मदतीशिवाय आत्मसन्मानाने कसे जगू शकतो, याविषयी प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले. गरजेप्रमाणे व्हीलचेअर, कमोडचेअर, जेलकुशन आणि मेडीकलकीटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव यांच्या हस्ते झाले. अनामप्रेम अहमदनगरचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश सेठ, माजी नगरसेवक सुहेल मुकादम, लायन्स क्लब पुणेचे नागेश चव्हाण सपत्नीक उपस्थित होते. डॉ. प्रकाश सेठ यांनी अनामप्रेमच्या कार्याविषयी माहिती सांगितली. सुहेल मुकादम आणि नागेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.

अमरावतीच्या प्रसिद्ध उद्योजिका राजश्री पाटील यांनी दिव्यांगांना पीपीटीच्या सहाय्याने सविस्तर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. अपघाताने अपंगत्व आल्याने कमरेखालील संवेदना गेलेल्या दिव्यांगांनी स्वत:ची काळजी कशी घ्यावी, युरीन मोशनसाठी कोणकोणती साधन वापरावीत आणि त्यांची स्वच्छता कशी राखावी, याची इत्थंभूत माहिती दिली. व्हीलचेअरवरुन बेडवर कसे बसावे, बेडवर झोपून व्यायाम कसे करायचे, शरीर लवचिक कसे ठेवायचे, डॉक्टरांच्या सल्ल्याने वॉकर आणि कॅलिपरच्या सहाय्याने चालणे याची प्रत्यक्ष व व्हिडीओच्या सहाय्याने माहिती दिली.

प्रशिक्षक कोमल माळी यांनी योगाविषयी आणि व्हीलचेअरवरुन रिक्षामधे कसे बसावे याची माहिती दिली. प्रात्यक्षिकही करून दाखवले. सादिक नाकाडे आणि संकेत चाळके यांनी कन्डोम कॅथेटरविषयी सविस्तर माहिती दिली. व्हीलचेअरवरुन फोरव्हीलरमधे कसे बसावे याचे प्रात्यक्षिक दाखविले. समन्वयक योगिता काळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सर्व कार्यक्रमासाठी अनामप्रेमचे सहाय्यक अभिषेक भगेकर, उमेश पंडुरे, विद्या रानडे यांनी मोलाची मदत केली.

या कार्यक्रमासाठी पालीतील संजीवनी संस्थेचे राजेश कांबळे, आस्था फाउंडेशनच्या सुरेखा पाथरे, प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे, योगेश सामंत, आरएचपी फाउंडेशनचे सदस्य समीर नाकाडे, डॉ. मुस्कान नाकाडे, संजय कदम, प्रिया बेर्डे, समिता कुळये, कल्पना भागत, गंगाराम रसाळ, प्रफुल्ल बिडु यांसह दिव्यांग आणि सहाय्यक उपस्थित होते.