देवरुख येथील जनसंघांचे कार्यकर्ते श्रीपाद सदाशिव सामंत यांचे निधन

देवरुख : संगमेश्वर पुनर्वसन वसाहत मधील रहिवाशी श्रीपाद सामंत ( 86 ) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. सामाजिक व राजकीय कार्यात ते अग्रेसर होते. कोल्हापूर हि त्यांची कर्मभूमी होती.गांधीहत्येनंतर कोल्हापुरात निर्माण झालेल्या द्वेषपूर्ण वातावरणात संघाचे काम सामंत यानी सुरू ठेवले होते. त्यासाठी हल्ला, निर्भत्सना आणि आर्थिक नुकसान त्यांनी सहन केले. संघाच्या शाखेवर झालेल्या दगडफेकीत ते दोनदा जखमी झाले होते. श्रद्धेय श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या जनसंघाच्या कोल्हापूर कार्यकारिणीतील पहिल्या 11 सदस्यांपैकी ते एक सदस्य होते. 1956 ते 1965 जनसंघ कोल्हापूर शहर मंत्री (शहर सेक्रेटरी) म्हणुन त्यांनी काम पाहिले. शहर जनसंघ बांधणीत मोलाचे योगदान दिले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भारत पाकिस्तान करारा विरोधात मोर्चात ते सामील होते. निधी संकलनासाठी त्यांनी मदत केली होती. 1967 साली जनसंघ उमेदवार श्रीकृष्ण भिडे यांच्या प्रचार माध्यमातून संगमेश्वर येथे संघ कार्यास सुरुवात केली. 1967 पासून जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाच्या प्रचार कार्यात सहभाग होता.1983 नंतर दृष्टीसमस्येमुळे सहभाग कमी होत गेला.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कोणत्याही आर्थिक आमिषाला बळी न पडता जनसंघ/भाजप कार्यकर्ते म्हणून सामंत यांनी काम केले. विश्व हिंदू परिषदेच्या 70 च्या दशकातील प्रयागराज मेळाव्यात त्यांचा सहभाग होता. कलम 370 हटाव मोहिमेत सहभाग, आणीबाणी प्रसंगी भूमिगत कार्य केले. 1995 महालक्ष्मी रेसकोर्स वरील भाजपा महाधिवेशन प्रसंगी उपस्थित होते. श्यामाप्रसाद मुखर्जी,  प्रेमाजीभाई असर, तात्यासाहेब नातू, प्रमोद महाजन, सुरेश साठ्ये यांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभले.

अटल बिहारी यांच्या मृत्यूनंतर काही दिवस त्यांनी जेवण सोडले होते, पक्षाबद्दल त्यांची आत्यंतिक भावनिकता होती.शाकाहार आणि प्राणिप्रेम सामंत यांनी शेवटपर्यंत जपले. शुक्रवारी दुपारी सामंत यांचेवर संगमेश्वर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संगमेश्वर,देवरुखमधील नागरीक उपस्थित होते. सामंत यांच्या पश्चात मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. माहितीचा अधिकार या पुस्तकाचे संकलक अमित सामंत यांचे ते वडील होत