खारेपाटण तावडेवाडी येथील डोगराला गेले तडे

भूस्खलन भागातील ६ कुटुंबासह ३३ जणांचे स्थलांतर
* उप जिल्हाधिकारी बर्गे,प्रांत कातकर, तहसीलदार देशपांडे यांनी दिली घटनास्थळाला तातडीने भेट

कणकवली
कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथून जवळ असलेल्या तावडेवाडी येथे डोंगर भागात डोंगराला भेगा पडल्या. ही घटना ९ सप्टेंबर रोजी पहाटे च्या वेळी घडली. घराच्या बाजूला व अंगणात जमिनीला भेगा गेल्या मुळे काही प्रमाणात भूस्खलन झाले.यामुळे येथील जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल यंत्रणेकडून तातडीने घटनस्थळी धाव घेतली. उप जिल्हाधिकारी शंकर बर्गे,प्रांत जगदीश कातकर,कणकवली तहसीलदार दीक्षित देशपांडे, नायब तहसीलदार श्री राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.
घटनेची माहिती मिळताच खारेपाटण सरपंच सौ प्राची ईस्वलकर यांनी याठीकणी प्रथम भेट देत नागरिकांना दिलासा दिला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश गुरव, नडगिवे सरपंच श्री भूषण कांबळे, खरेपाटण सर्कल श्रीम एस आर बावलेकर, तलाठी के सिंगणाथ, खारेपाटण पोलीस पाटील दिगंबर भालेकर, नडगिवे पोलीस पाटील गोपाळ चव्हाण,खारेपाटण तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुहास राऊत यांनी देखील घटनास्थळी भेट दिली व भूस्खलनाची पाहणी केली.
याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटण तावडेवाडी येथील रहिवासी असलेले बांधव आपल्या कुटुंबासह या डोंगर भागात गेली १४ वर्षापासून राहत असून येथे त्यांची ५ घरे असून ६ कुटुंबासह ३३ माणसे येथे राहत आहेत.परंतु काल पासून पुन्हा सुरू झालेल्या संततधार पावसाने येथील डोंगरी व जंगल भागात राहत असलेल्या या नागरिकांच्या घराना पहाटे तडे गेले असून काही काही प्रमाणात दरडी भाग कोसळत आहे.यामुळे या घराना मोठा धोका निर्माण झाला असून भविष्यात मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे.
आम्ही व्यवसायानिमित्त भटकत असलेली विस्थापित मोलमजुरी व मासेविक्री करून पोट भरणारे घोरपी समाजाची कुटुंबे असून आम्हला जिथे जागा मिळाली. तिथे आम्ही सद्या राहत आहोत. मात्र आमच्या जिवितला आता याठिकाणी धोका निर्माण झाला असून सरकारने आमचे पुनर्वसन करून आम्हाला पक्की घरे बांधून द्यावीत अशी आमची मागणी आहे.तावडेवाडी येथील नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण होऊ नये म्हणून सदर नागरिकांची सद्या राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायत मालकीच्या इमारतीत करण्यात येईल. मात्र प्रशासनाने येथील नागरिकांच्या पुनर्वसन बाबत गांभीर्याने विचार करावा. स्थानिक ग्रामपंचायत म्हणून आम्ही सहकार्य करू असे सरपंच यांनी सांगितले.