पुढील पाच वर्षात 500 कोटी व्यवसायाचे ध्येय
29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
राजापूर | प्रतिनिधी : राजापूर तालुका कुणबी पतपेढीला या आर्थिक वर्षात एक कोटी एक लाख इतका निव्वळ नफा झाला असून या नक्यातुन संचालक मंडळाने सभासदांना शिफारस केलेल्या 12 टक्के लाभांश वाटपाला मंजूरी देण्यात आली. तर पुढील पाच वर्षातील संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडताना नवीन शाखा निर्मितींबरोबरच एकूण व्यवसाय 500 कोटीवर नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित सर्वच सभासदांनी संस्थेच्या कामकाजाचे कौतुक करत विधायक अशा सुचनाही मांडल्या.
राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीची 29 वी वार्षिक सभा रविवारी राजापूर हायस्कुलच्या कलामंदिर सभागृहात संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. संस्थेच्या एकूणच चांगल्या कामाची दखल घेत सभासदांकडून या सभेत नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक आणि कर्मचारी वृंदाचे अभिनंदन करण्यात आले. सभागृहाच्या वतीने यावेळी संचालक मंडळ व कर्मचारी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
प्रारंभी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी पतपेढीच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. पतसंस्थेने या आर्थिक वर्षात यशस्वी भरारी घेत चांगली प्रगती साधल्याचे नमुद केले. संस्थेची एकूण सभासद संख्या 12 हजार 600 इतकी असून संस्थेच्या एकत्रित व्यवसाय वाढ होऊन तो 99 कोटी 10 लाख इतका झाला आहे. तर संस्थेने 57 कोटींच्या ठेवी जमा करताना संस्थेने 42 कोटी 8 लाखाचे कर्ज वितरण केले आहे. संस्थेचे खेळते भागभांडवल 66 कोटी 48 लाख इतके असून एकूण गुंतवणूक 21 कोटी 3 लाख इतकी आहे. नवीन शाखांसह सर्वच शाखांनी या आर्थिक वर्षात चौफेर प्रगती साधल्याचे नमुद करण्यात आले.
यावेळी सभासद रविकांत भामत, विनायक शिवगण, संदीप पुजारी, वासुदेव मासये यांनी चर्चेत सहभाग घेताना संस्थेने केलेल्या कामकाजाचे कौतुक केले. संस्थेच्या प्रगतीत संस्थेचा कर्मचारी हा प्रमुख घटक असून या कर्मचाऱ्यांना संस्थेने प्रोत्साहनपर अनुदान द्यावे अशी मागणी यावेळी या सभासदांनी केली. यावर अध्यक्ष मांडवकर यांनी कर्मचाऱ्यांप्रती संस्थेला नक्कीच सहानुभुती आहे. मात्र संस्थेचा एकूण व्यवसाय आणि कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च याचा ताळमेळ घालुन व सहकार विभागाच्या नियमांना अधिन राहून काम करावे लागते. मात्र नक्कीच भविष्यात या मागणीचा सहानुभुतीपुर्वक विचार करून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय दिला जाईल अशी ग्वाही दिली. सागवे शाखेतील एक कर्मचारी कमी केल्याबाबत दादा मोंडे यांनी प्रश्न उपस्थित करून या ठिकाणी कर्मचारी द्यावा अशी मागणी केली. यावर अध्यक्षांनी लवकरच या ठीकाणी कर्मचारी दिला जाईल अशी ग्वाही दिली. रविकांत भामत यांनी भू शाखेला जोडून देण्यात आलेल्या गावांची संख्या कमी असून ती वाढविली पाहीजे अशी मागणी केली. त्यावरही निर्णय घेण्याचे आश्वासन अध्यक्ष मांडवकर यांनी दिले. याप्रसंगी विषय पत्रिकेवरील विविध विषयांवर झालेल्या चर्चेत सिताराम कोसंबे, अनाजी तांबे, रामचंद्र वरेकर, संतोष कुळये, नरेश शेलार यांसह अन्य सदस्यांनी सहभाग घेत आपली मते मांडली. संस्थेने सर्वच शाखांच्या ठीकाणी स्वमालकीच्या जागा घ्याव्यात तर राजापूर शाखा प्रशस्त जागेत विस्तारित करावी अशी सुचनाही भामत यांनी मांडली.
यावेळी काही सभासदांनी यावर्षी कुणबी पतपेढीच्या संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडणूकीची परंपरा खंडीत झाल्याबद्दल नाराजी व खेद व्यक्त करत भविष्यात संगळयांनी एकसंघपणे काम करून समाजाची आदर्श असलेली पतसंस्था वाढीसाठी प्रयत्न केले पाहीजेत व निवडणूक आणि संघर्ष टाळाला पाहिजे अशी भूमिका मांडली. यावर अध्यक्ष मांडवकर यांनी निश्चितच आपल्या सुचनेचा आदर केला जाईल कुणाबद्दली द्वेष भावनेतुन काम केले जात नाही व जाणार नाही असे नमुद करत भविष्यात हातात हात घालुन संस्थेची प्रगती साधूया असे आवाहन केले.
या सभेत मागील वार्षिक अधिमंडळ बैठकीचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. तर वार्षिक अहवाल, नफा-तोटा पत्रक, ताळेबंद, वैधानिक लेखापरीक्षण अहवाल याला मंजूरी देण्यात आली. तर नफा विभागणीस मान्यता देत वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. तर सभासदांकडून आलेल्या पत्रांचे वाचन करण्यात आले. केळवली व जैतापूर येथे संस्थेची शाखा सुरू करावी अशा आशयाच्या मागणीचे पत्र सभासदांनी दिले आहे. त्यावरही निर्णय घेतला जाईल असे अध्यक्ष मांडवकर यांनी सांगितले. क्रियाशील सभासद संज्ञेबाबत सभासदांनी जागरूक रहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
आपल्या समारोपाच्या भाषणात अध्यक्ष मांडवकर यांनी सभासदांच्या सूचनांचे कायमच स्वागत असेल व संस्थेच्या प्रगतीसाठी काम केले जाईल अशी ग्वाही दिली. आपण मांडलेल्या सुचनांप्रमाणे कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी सांगितले. तर संस्थेच्या प्रगतीबाबत चांगली चर्चा करून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पाडल्याबद्दल सभासदांना धन्यवाद दिले.
या सभेला उपाध्यक्ष प्रकाश लोळगे यांसह सर्व संचालक व काही जुने जाणते संचालक, कर्जवसुली अधिकारी श्रीकांत राघव, सर्व शाखाधिकारी व सभासद उपस्थित होते. आभार सीईओ जितेंद्र पाटकर यांनी मानले.












