कारिवडेचे सुपुत्र शहीद सुनील सावंत यांना अखेरचा निरोप

महाराष्ट्र पोलीस व जवानांच्या तुकडीकडून मानवंदना

‘अमर रहे अमर रहे, सुनील सावंत अमर रहे ‘ च्या घोषणांनी दुमदुमला आसमंत

सावंतवाडी । प्रतिनिधी : “जब तक सूरज चांद रहेगा, सुनील सावंत आपका नाम रहेगा…!”,

“अमर रहे, अमर रहे, सुभेदार सुनील सावंत अमर रहे!’,

“वंदे मातरम्..!, भारत माता की जय..! ”

‘अमर रहे, वीर जवान सुनील सावंत अमर रहे..!”
अशा घोषणांसह साश्रूपूर्ण नयनांनी, पंजाब येथे शहीद झालेले १९ मराठा बटालियनचे जेसीओ सुभेदार तथा कारीवडे गावचे वीर सुपुत्र सुनील राघोबा सावंत यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. महाराष्ट्र पोलीस व जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून शहीद सुनील सावंत यांना अखेरची मानवंदना दिली.
शहीद सुनील सावंत यांचे पार्थिव विमानातून शनिवारी सकाळी नियोजित वेळेपेक्षा तब्बल तीन तास उशिरा दिल्ली विमानतळावरून गोवा – मोपा विमानतळावर पोहोचले. त्यानंतर गोवा येथून दुपारी दोन वाजता त्यांचे पार्थिव बेळगाव भारतीय सैन्य दलाच्या एएलएस गाडीतून कारीवडे गावात दाखल झाले. त्यानंतर भैरववाडी शाळा ते शहीद सुनील सावंत यांच्या घरापर्यंत त्यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात झाली.
त्यांचे पार्थिव घरी आणल्यानंतर पत्नी सुप्रिया, मुलगी स्नेहल, मुलगा संज्योत, वडील राघोबा यांच्यासह सावंत कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. यावेळी उपस्थित सर्वांचे डोळे अक्षरशः पाणावले. त्यानंतर “शहीद सुभेदार सुनील सावंत अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा, सुनील सावंत आपका नाम रहेगा..!” अशा भावपूर्ण घोषणांनी त्यांच्या अंतिम यात्रेस सुरुवात झाली.
तिरंग्यात लपेटलेल्या त्यांच्या शवपेटीला मानवंदना देत या अंत्ययात्रेत महिलांसह शेकडो ग्रामस्थांचा सहभाग होता. यानिमित्त कारिवडे भैरववाडी शाळा, शहीद सुनील सावंत यांचे घर ते स्मशानभूमीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून तसेच पताका लावून वीर जवान सुनील सावंत यांना भैरववाडीवासियांनी आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली.
शहीद सुभेदार सुनील सावंत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सकाळपासूनच माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व माजी सैनिक, महसूल व पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच कारीवडे परिसरातील सर्व महिला ग्रामस्थ येत होते.
यावेळी शहीद सुनील सावंत यांना भारतीय सैन्य दलाच्या बेळगाव येथील आर्मी, मराठा बटालियन, महसूल व पोलीस आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून अखेरची मानवंदना दिल्यानंतर शहीद सावंत यांचे सुपुत्र संज्योत सावंत याने मुखाग्नी दिला आणि “सुनील सावंत अमर रहे..!” अशा घोषणांनी शहीद सुनील सावंत यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
शहीद सुनिल सावंत हे एक जाबाज सैनिक होते. त्यांनी काश्मीर, लेह लडाख, डेहराडून, महू, राजस्थान, गुजरात, गोवा येथे मुलाना एनसीसी प्रशिक्षण देण्यासाठी २ वर्ष सेवा बजावली. त्यानंतर पाकव्याप्त जम्मू काश्मिर मधील ऑपरेशन विजय आणि कारगिल युद्धातही त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यानंतर अरुणाचल प्रदेश मध्ये बर्फाच्छादित सिमेवर त्यांनी एक वर्ष सेवा बजावली. गेल्या तीन वर्षापासून ते भारतीय सैन्य दलाच्या पंजाब अभोर प्रांतात १९ मराठा बटालियन मध्ये सेवा बजावत होते.
शहीद सुनिल सावंत भारतीय सैन्य दलात अग्रस्थानी होते तसेच ते गावातील सर्व उत्सव, खेळ यांच्या आयोजनात सक्रिय असायचे. शेती कामात तरबेज असलेले सुनिल पट्टीचे पोहणारे होते. कारिवडे भैरववाडीतील अनेकांचे ते पाठीराखे होते. त्यामुळे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे सुनिल सावंत हे कारिवडे भैरववाडीचे जणू हिराच होते. आपण ज्या समाजात घडलो त्या समाजासाठी काहीतरी करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी त्यांची नेहमी घडपड असायची.
सुनिल भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना शहीद झाले याचा सर्वांनाच अभिमान व गर्व आहे. त्यांच्या या बलिदानातून कारीवडे गावातील तरुणांसाठी प्रेरणा आणि देश भक्तीचे उदाहरण मिळाले आहे. शहीद सुनिल सावंत याचा हाच आदर्श समोर ठेऊन या गावातील युवक सुनीलला श्रद्धांजली म्हणुन सैन्यात भरती होणार असल्याचे अनेक तरुणांनी आवर्जून सांगितले.
त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. त्यांच हे बलिदान कारीवडे गावातील तरुणांसाठी प्रेरणा आणि देशभक्तीचे उदाहरण देणार आहे. शहीद सुनिल सावंत यांचा हाच आदर्श समोर ठेऊन या गावातील युवक सुनीलला श्रद्धांजली म्हणुन सैन्यात भरती होतील अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त करत आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार राजन तेली, युवराज लखमराजे सावंत- भोंसले, निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, शिवसेशा जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, कारीवडे सरपंच आरती माळकर, उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, माजी सभापती मंगेश तळवणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, शिवदत्त घोगळे, हिदायत खान, गजानन नाटेकर, अण्णा केसरकर, माजी सरपंच अपर्णा तळवणेकर, आनंद तळवणेकर, अशोक माळकर आदींसह आजी-माजी सैनिक संघटनांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

शहीद सुनील सावंत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद सुभेदार सुनिल सावंत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाचा राष्ट्रध्वज व शहीद जवान सुनील सावंत यांचा गणवेश त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. आपला एकुलता एक मुलगा देशासाठी शहीद झाला अशी भावना यावेळी त्यांचे वडील राघोबा सावंत यांनी व्यक्त केली. शहीद सुनिल सावंत यांच्या पश्चात पत्नी सुप्रिया, मुलगी स्नेहल, मुलगा संज्योत, वडील राघोबा असा परिवार आहे.
Sindhudurg