चार दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास ‘आक्रोश मोर्चा’ चा इशारा
सावंतवाडी | प्रतिनिधी:सावंतवाडी शहरात सध्या सुरू असलेल्या नळ पाणी योजनेच्या कामातील तांत्रिक बिघाडामुळे पाणीटंचाई निर्माण झाली असून, या प्रश्नावरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या चार दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नगरपालिका प्रशासनावर ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी दिला आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी शहराच्या पाणी प्रश्नावर चर्चा करण्यात आली. संजू परब म्हणाले की, “शहरात अनेक ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम करताना अनेक ठिकाणी गळती होत आहे, ज्यामुळे पाणी वाया जात असून नागरिकांना कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. ऐन एप्रिल महिन्यात नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने जनतेत संताप आहे.”
नगरपालिका प्रशासनाने पाणी सोडण्याच्या वेळेत बदल केला असला, तरी तांत्रिक त्रुटी दूर झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, असे परब यांनी नमूद केले. पाईपलाईन आणि गॅस पाईपलाईनच्या कामामुळे नागरी सुविधांवर होणाऱ्या परिणामांबाबत आगामी मासिक बैठकीत प्रशासनाला जाब विचारला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
येत्या चार दिवसांत जर पाणीपुरवठ्याचे नियोजन सुधारले नाही आणि गळती थांबवून नियमित पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर संतप्त नागरिकांसह नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या पत्रकार परिषदेला नगरसेविका ॲड. नीता कविटकर, गट नेते तथा नगरसेवक बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, ॲड. सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, देव्या सूर्याजी यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.












