चिपळूण महिला संरक्षण कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
चिपळूण | वार्ताहर : चिपळूण येथील महिला संरक्षण अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये श्रीमती माधवी जाधव यांनी सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शहरातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील महिला सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या सर्व महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवरती जीवनात चालण्याचा संकल्प केला. महिला संरक्षण कार्यालय म्हणजेच अभय केंद्र या कार्यालयामध्ये संरक्षण अधिकारी माधवी जाधव या महिलांच्या अनेक समस्या अगदी तन्मयतेने सोडवत असतात. तळागाळातील महिलांना न्याय मिळावा यासाठी त्या नेहमीच तत्पर असतात.त्याचबरोबर समाजात जनजागृती व्हावी यासाठी सुद्धा श्रीमती माधवी जाधव महापुरुषांच्या जयंती किंवा त्यांच्या विचारधारा समाजात प्रभावित करण्यासाठी प्रयत्न असतात. त्यांच्या या अभय केंद्रामध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केल्यानंतर संरक्षण अधिकारी माधवी जाधव यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उघडताना त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी चालवलेली शिक्षणाची चळवळ आणि त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट या सर्वांचा विचार आताच्या महिलांनी करणे गरजेचे आहे. तरच आपल्याला सावित्रीबाई फुले यांचे योगदान समजून घेतले असे म्हणता येईल. त्याचबरोबर महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचार व अत्याचार यासंदर्भात त्यांनी महिलांना माहिती दिली. महिलांना आयुष्य जगताना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते. आताच्या बदलत्या काळानुसार महिलांच्या वर अनेक संकटे येत आहेत. या संकटांना सामोरे कसे जायचे या संदर्भात सुद्धा त्यांनी माहिती दिली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण यांनी सांगितले की, महिलांच्या समस्यांसाठी आपण एकत्र पणे लढले पाहिजे. ज्याच्या ठिकाणी महीलांवरती अत्याचार होईल त्या ठिकाणी आपण एकत्रित येऊन लढा दिला तर नक्कीच महिलांना आपण न्याय मिळवून देऊ शकतो.
त्याचबरोबर सावित्रीच्या लेकी म्हणून आपलं काही कर्तव्य बनते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सावित्रीबाईंचे योगदान पोचवण्यासाठी आपण जनजागृतीचे कार्यक्रम सुद्धा घेतले पाहिजे असे त्यांनी बोलताना सांगितले. त्याचबरोबर माजी नगराध्यक्षा रीहाना बिजले यांनी सुद्धा मार्गदर्शन करताना सांगितले की, सद्यस्थितीला समाजामध्ये अनेक घटना आपल्याला पाहावयास मिळतात. या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रथम स्वतः व प्रेम करावे लागेल. सतत हसतमुखाने प्रत्येक संकटाला सामोरे गेले तर जगण्याची नवीन ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होईल आणि यातूनच आपल्याला यशाचा मार्ग सापडेल. त्याचबरोबर सध्या व्यसनाधीनता आणि महिलांवर होणाऱ्या हिंचाचाराबाबत काही घटनांवर त्यांनी प्रकाश टाकला. आलेल्या सर्वच महिलांनी आपली मनोगते व्यक्त करताना सावित्रीबाईंचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला. सावित्रीच्या लेकी म्हणून आपण पहिल्यांदा सत्यवानाच्या सावित्री पेक्षा जोतिबांची सावित्री जाणून घेणे गरजेचे आहे.
तरच आपल्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला शिक्षण किती महत्त्वाचा आहे आणि शिक्षणाबरोबरच घरातील संस्कार किती महत्त्वाचे आहेत . आपल्या घरात मुलांवरती चांगले संस्कार झाले ते निश्चितच प्रत्येक महिला बिनधास्त घराबाहेर पडू शकते. तिच्यावर कोणत्याच प्रकारचे अत्याचार होऊ शकत नाही. ही मानसिकता बदलण्यासाठी पहिल्यांदा आपल्या घरापासूनच आपण सुरुवात करायला पाहिजे असा सर्व निर्धार यावेळी जमलेल्या महिलांनी सावित्रीबाईंच्या जयंती निमित्ताने केला. महिला संरक्षण अधिकारी श्रीमती. जाधव यांचे सर्वांनी आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप माधवी जाधव यांनी केला.
यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रवादी महिला जिल्हाअध्यक्ष चित्रा चव्हाण, माजी नगराध्यक्षा रीहणा बिजले, माजी नगरसेविका अदिती देशपांडे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष दीपिका कोतवडेकर, डॉ. रेहमत जबले, काँग्रेस पक्षाच्या उपनिरीक्षका रवीना गुजर, शिक्षक विस्तार अधिकारी खडस, केंद्रप्रमुख शैलेजा लोंढे, लता भोजने, स्वाती भोजने, पुनम भोजने, सोनाली मालुसरे आदी महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.