वाटद कवठेवाडी शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Google search engine
Google search engine

जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राचे लेकीच्या अभियानास सुरुवात

खंडाळा : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेत प्रथम शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर जिजाऊ ते सावित्री महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुरस्कृत केलेल्या जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राचे लेकीच्या अभियानाचे प्रास्ताविक शाळेतील शिक्षक गोविंद भाऊराव डुमनर यांनी करून या अंतर्गत विविध उपक्रम शासनाच्या सूचनेनुसार व महिलांचा सन्मान होण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.
त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेऊन आज प्रत्येक शाळांमध्ये शिकत असलेल्या मुलींनी आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान ठेवण्यासाठी आपापल्या क्षेत्रामध्ये अग्रेसर राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
त्यासोबतच या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असणारे शाळेतील बालरक्षक विश्वनाथ शिर्के यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सदर अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी सर्व पालकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ भाऊ धनावडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करून अभियानास शुभेच्छा दिल्या.

जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा अभियान २०२३ अंतर्गत शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असून त्याद्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे. त्यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, किल्ले बांधणी, विद्यार्थ्यांची व महिलांची मोफत आरोग्य तपासणी, विद्यार्थी व महिलांसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने इत्यादी उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.