गणेशविसर्जनाचे प्रसंगी नदीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न

दापोली l प्रतिनिधी: दापोली तालुक्यातील वळणे येथे गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरूणाला लाथ मारून नदीत ढकलण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.महेंद्र लक्ष्मण टेमकर (वय ३९ वर्षे, रा. वळणे) या संशयित आरोपीवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याला नदीत ढकलल्याचा आरोप आहे. चंद्रकांत धोंडु टेमकर चुलत्यांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी वळणे येथील नदीवर त्यांच्या मुलांसह गेले होते. त्यावेळी फिर्यादी हे प्रसादाचे वाटप करत असताना यातील संशयित आरोपी महेंद्र याने फिर्यादीच्या पाठीमागून येऊन त्याच्या जीवाला धोका निर्माण होईल, नदीत पडल्यास त्याचा मृत्यू होईल, इतक्या बेदरकारपणे पुलावरुन जोरात धक्का दिला आणि अक्षरशः नदीत ढकलले. पण सुदैवाने ते या घटनेतून बचावले. या धक्कादायक घटनेत चंद्रकांत टेमकर यांच्या डाव्या पायाच्या टाचेला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.