गुरुवार ऐवजी शुक्रवारी सुट्टी

रत्नागिरी : उद्या गुरुवार दि. 28 सप्टेंबर रोजी असणारी सुट्टी शुक्रवार दि. 29 सप्टेंबर रोजी राज्यशासनाने आणि रिझर्व बॅंकेने जाहीर केल्याने उद्या शासकीय कार्यालये आणि बॅंक सुरु राहणार आहेत.
उपसचिव रो. दि. कदम-पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे, राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्टयांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी गुरुवार दि. 28 सप्टेंबर रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तथापि, या वर्षी गुरुवार दि. 28 स्पटेंबर रोजी हिंदू धर्मियांचा अनंत चतुदर्शी हा सण आहे. अनंत चतुदर्शीच्या दिवशी राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश मूर्तींची मोठी मिरवणूक काढण्यात येते. नंतर तिचे विसर्जन करण्यात येत असल्याने हिंदू बांधवांची मोठी गर्दी होत असते.
यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी ही गुरुवार दि.28 सप्टेंबर ऐवजी शुक्रवार दि. 29 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येत आहे.
भारतीय रिझर्व बॅंकेचे महाप्रबंधक आर. सुदीप यांनीही याबाबत परिपत्रक प्रसिध्दीस दिले असून, उद्या गुरुवार दि. 28 सप्टेंबर ऐवजी शुक्रवार दि.29 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे.