वेर्ले येथील युवकाकडून काकासह कुटुंबीयांना मारहाण

वेर्ले येथील युवकाकडून काकासह कुटुंबीयांना मारहाण
सावंतवाडी । प्रतिनिधी : पोलिसात दाखल झालेल्या तक्रारी व गुन्ह्याचा राग मनात धरुन वेर्ले येथील एका युवकाने घरात काकासह त्यांची पत्नी व सुनेला लाकडी दांड्याने व दगडाने मारहाण केली तसेच घराच्या खिडकीच्या काचा फोडून नुकसान केले.यात हाताला काचा लागल्याने तो स्वतः जखमी झाला आहे. हा प्रकार सुरू असताना स्थानिक ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले
ही घटना मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास सुतारवाडी येथे घडली. या प्रकरणी यशवंत अर्जुन राऊळ ( 67) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विनोद मधुकर राऊळ ( २८) याच्यावर गुन्हा दाखल आला आहे. यातील संशयित विनोद याच्यावर यापुर्वी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत काही दिवसापुर्वी त्याला अटक झाली होती. त्यामुळे हे सर्व गुन्हे दाखल होण्यास काका जबाबदार आहेत असा गैरसमज करुन तो काल रात्री साडे अकरा वाजता राऊळ यांच्या घरात घुसला. यावेळी त्यांच्या टीशर्ट व गळ्याला धरुन त्यांना लाकडी दांड्याने मारहाण केली.
यावेळी त्यांना सोडविण्यासाठी गेलेल्या त्यांची पत्नी योजना आणि चुलत सुन विजया यांच्या डोक्यावर दगड मारुन गंभीर दुखापत केली तसेच घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या. यात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे हा प्रकार सुरू असताना तेथील ग्रामस्थांनी त्याला पकडून ठेवले व याबाबतची कल्पना पोलिसांना दिली त्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेत त्याला ताब्यात घेतले परंतु राऊळ यांनी आपण वृद्ध असल्यामुळे सकाळी येऊन तक्रार देतो असे सांगितले.
त्यानंतर आज त्यांनी तक्रार दिली त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले