माझे कोकण/ संतोष वायंगणकर
भारतीय संसदेत लोकसभागृहात तत्कालिन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू ज्यांच अभ्यासपूर्ण भाषण एैकण्यासाठी आवर्जुन उपस्थित रहात असत त्या स्व.बॅ.नाथ पै यांचा १०१ वी जयंती तीन दिवसापूर्वीच झाली. सर्व बदलत्या राजकारणात नाथ पै कोण असा दुर्दैवाने आजच्या तरूणपिढीतील कोणी प्रश्न केला तर त्याच कोणाला आश्चर्य वाटणार नाही. असच आजच आपल्या अवती-भवतीच राजकारण आहे. मात्र, जेव्हा-जेव्हा कोकण कोकणच राजकारण समाजकारण कोकणच नेतेपण या विषयाची चर्चा होत राहिल तेव्हा-तेव्हा बॅ.नाथ पै हे नाव अग्रक्रमाणे घेतल्याशिवाय रहात नाही. संसद, लोकसभा हे विषयांची चर्चा सुरू होते. तेव्हा नाथांच कोकण म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. समाजवादी विचारसरणी असलेल्या बॅ.नाथ पै यांनी राजापूर लोकसभा मतदार संघाचे १९५७,१९६२, आणि १९६७ अशा सलग तीनवेळा लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रीक करत राजापूर लोकसभा मतदार संघाचे संसदेत प्रतिनिधीत्व केले. तत्पूर्वी १९५२ साली मुंबईतून बॅ.नाथ पै यांनी मुंबईतून निवडणुक लढवली. परंतु बॅ.नाथ पै मुंबईतील विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. त्या पराभवानंतर नाथांनी कोकणातील मतदारसंघ निवडला आणि कोकणानेही नाथांवर भरभरून प्रेम केलं. कोकणातील जनतेशी बॅ.नाथ पै यांच सहज सुंदर नात होतं. उत्तम वक्ते असलेले नाथ जनतेशी सहज सोप्या भाषेत संवाद साधत यामुळे बॅ.नाथ पै हे कोकणातील प्रत्येक कुटुंबाला आपले वाटत. नि:स्वार्थी, सरळ, साधा स्वभाव जगण्यातला, वागण्यातल आणि बोलण्यातील असलेली सत्यता यामुळे बॅ.नाथ पै हे आदर्शच राहिले. बॅ.नाथ पै यांना त्यावेळच्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना काँग्रेसमध्ये या मंत्री पद देऊ केलं परंतु बॅ.नाथ पै यांनी ते विनम्रपणे नाकारल. बॅ. नाथ पै यांच इंग्रजी भाषेवर प्रभूत्व होते. नाथांच्या भाषणांचा प्रभाव संसदेत होता. बॅ.नाथ पै बोलायला उभे राहिले की सरकारचे दोष दाखवत सत्ताधारी काँग्रेसच्या अनेक निर्णयावर नाथांनी आपल्या भाषणातून आसूड ओढले आहेत. परंतु दोष दाखवतानाही ज्या हळूवारपणे ते दाखवत ते नाथांच कसब होतं. बॅ.नाथ पै अल्पायुषी ठरले. ४९व्या वर्षी त्यांच निधन झालं. त्यांच्या पत्नी क्रिस्टल या ऑस्ट्रेलियाच्या होत्या. बॅ.नाथ पै यांचा जेव्हा मृत्यु झाला तेव्हा बॅ.नाथ पै यांच्या घरी १०,०००(दहा हजार रूपये) शिल्लक होते. नाथांच्या पत्नी श्रीमती क्रिस्टल यांनी ते दहा हजारचे पाकीट नाथांच्या मृत्युनंतर राजापूर लोकसभा मतदारसंघ निवडणुक लढविणाऱ्या स्व.प्रा. मधु दंडवते यांच्या हाती दिले आणि समाजवादी पक्षकार्याला ते खर्च करायला सांगितले. प्रा.मधु दंडवते यांनी पुढची पंचवीसवर्षे राजापूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. तब्बल चाळीस वर्षे बॅ.नाथ पै यांच्या विचारांचा राजकीय प्रभाव राहिला. साधा माणूस परंतु उच्च विचारसरणी असलेल्या बॅ.नाथ पै यांचा विचार आणि त्यांच स्थान अबाधीतच आहे. नाथांच्या प्रा.मधु दंडवते यांच्यासोबत वावरणारी, त्यांच्यासोबत काम केलेली काही मोजकी माणसेच आज ह्यात आहेत. बॅ.नाथ पै यांचा विषय जरी कोकणात कोणत्या गावी निघाला आणि त्या पिढीच्या कोणी ज्येष्ठ जर तिथे उपस्थित असेलतर नाथांच्या असंख्य आठवणी तो भरभरून बोलल्याशिवाय राहणार नाही. या राजापूर मतदार संघाचे नंतर नाव बदलले गेले. आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ म्हणून अस्तित्वात आला. कर्नल सुधीर सावंत, निलेश राणे, विनायक राऊत यांना या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याचे भाग्य लाभले. कोकणातील या मतदारसंघाला एक वेगळा वारसा आहे. विचारांचा अभ्यासूपणाच आहे. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघाच प्रतिनिधीत्व कोण करणार ? हा विषय चर्चीला जात आहे. २०१४ आणि २०१९ साली या मतदार संघातून शिवसेना-भाजपा पक्षाला जनतेने कौल दिला होता. आजच्या घडीला या मतदार संघाच चित्र वेगळ आहे. २०१९ च्या निवडणुकीत स्वाभिमान पक्षाच्या तिकीटावर निवडणुक लढविलेल्या माजी खासदार निलेश राणे यांना तीन लाख मत मिळाली होती. या निवडणुकीत ही तीन लाख मत भाजपा सोबत आहेत. यामुळे या मतदार संघाचे या निवडणुकीचे चित्र वेगळे असणार आहे. या मतदार संघाचे गेली १० वर्षे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खा. विनायक राऊत यांनी फक्त राणे विरोध, राणेंवर टिका असा एककलमी कार्यक्रम राबविला. हे गेल्या दहा वर्षातील राजकारणाकडे तटस्थपणे पाहिल्यावर समजून येते. दहावर्षात सत्तेत असूनही विकासात एक पाऊलही त्यांना पुढे टाकता आले नाही. संसदेतील कामगिरीबद्दल न बोलणेच योग्य ठरेल. याच कारण त्यावर काही बोलाव आणि एैकाव अशी कोणतीही कामगिरी नाही. केवळ भाजपा-सेना युती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा यामुळे विनायक राऊत यांना या मतदार संघातून दोनवेळा निवडुन जाण्याची संधी मिळाली हे वास्तव कुणाही राजकीय धुरीणांना खोडून काढता येणार नाही. २०२४ च्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तशी आताच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची चर्चा सुरू झाली आहे.
काय होणार ? कोण कोणासोबत असणार ? उमेदवार कोण असणार हे सर्व जर-तर चे प्रश्न आहे. जर-तर वर राजकीय अंदाज बांधण योग्य होणार नाही. जे होईल ते दिसेलच परंतु शेवटी राजकारण आहे ना ! मग चर्चा तर होत रहाणारच.











