दहा वर्षांपूर्वी हरवलेला, कणकवली पोलिसांना …सापडला

कणकवली : तालुक्यातील परबवाडी येथील दहा वर्षापासून बेपत्ता असलेले ४२ वर्षीय अरुण नाईक यांचा शोध घेण्यात हवालदार रवींद्र बाईत यशस्वी झाले आहेत. बेपत्ता असल्याबाबत पोलीस ठाण्यात तब्बल दहा वर्षांपूर्वी नोंद झाली होती. अखेरीस आज घडीस ५२ वर्षाचे असलेले अरुण कृष्णा नाईक यांना शोधण्यात तपासी अंमलदार तथा पोलीस हवालदार रवींद्र बाईत यांना यश आले. रवींद्र बाईत यांनी शनिवारी सायंकाळी अरुण नाईक यांना त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले. याबाबत नातेवाईकांनीही पोलीसांचे आभार मानले.

तत्कालीन ४२ वर्षे वय असलेले अरुण कृष्णा नाईक हे २२ ऑक्टोबर २०१३ या दिवशी राहत्या घरातून बेपत्ता झाले होते. अरुण यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तात्काळ फिर्याद दिली होती. तेव्हापासून पोलीस अरुण नाईक यांचा शोध घेत होते. अरुण नाईक नेमके कुठे आहे हे समजून येऊ शकत नव्हते. सहा महिन्यांपूर्वी ह्या घटनेचा तपास हवालदार रवींद्र बाईत त्यांच्याकडे देण्यात आला. बाईत यांनी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. अरुण नाईक बेपत्ता असूनही कणकवलीत येऊन जाऊन असतात, अशी माहिती गुप्त माहितीगाराद्वारे मिळाली. काही दिवसांपूर्वीच अरुण हे कणकवलीत आले असून येथील एका हॉटेलमध्ये काम करत असल्याचे बाईत त्यांना समजले.

त्यानुसार बाईत यांनी शनिवारी सायंकाळी ते हॉटेल गाठून यांना ताब्यात घेतले. अरुण नाईक यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले. त्यानुसार कुटुंबीयही पोलिस ठाण्यात दाखल झाले. अरुण हे त्यावेळी मोलमजुरी करायचे मात्र ते बेपत्ता का झाले याचा तपास सुरू असल्याचे कणकवली पोलिसांनी सांगितले.