कणकवली : महामार्गावर वागदे येथे गोवा ते कणकवली जाणारी कार पलटी होऊन अपघात झाला. अपघातामध्ये चालक सुदैवाने बचावला. दरम्यान या अपघातग्रस्त कारमधील गोवा बनावटीची दारू अन्य वाहनातून लंपास करण्यात आली. या प्रकरणी अपघातग्रस्त कार चालक रोहित साळगावकर (रा.कोलगाव, सावंतवाडी) आणि दारू लंपास केल्या प्रकरणी बंटी सावंत (वरवडे, ता.कणकवली) या दोघांविरोधात कणकवली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. कोलगाव सावंतवाडी येथील रोहित दत्ताराम साळगावकर हे आपल्या कार (एमएच ०३ बीएन १८०५) मधून गोवा ते कणकवली असा प्रवास करत होते. या कारमध्ये गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक केली जात होती अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
काल सायंकाळी पाचच्या सुमारास वागदे डंगळवाडी येथे महामार्गाच्या लगत ही कार पलटी झाली. या घटनेनंतर कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता कार मध्ये कुणीही आढळून आले नव्हते. मात्र अधिक तपासानंतर ही कार रोहित साळगावकर चालवत असल्याची माहिती निष्पन्न झाली. तर या कारमधील दारू बंटी सावंत यांनी अन्य वाहनातून लंपास केल्याचीही बाब निदर्शनास आली. कणकवली पोलिसांनी तातडीने कारवाई करून अपघातग्रस्त कारमधील दारू लंपास करणाऱ्या बंटी सावंत याला वाहनासह ताब्यात घेतले.
त्यावेळी त्या वाहनामध्ये गोवा बनावटीची १८ हजार ७७० रूपयांची दारू आढळून आली. या प्रकरणी गोवा बनावटीच्या दारूसह वाहतूक करणारे सुमारे तीन लाख रूपयांचे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणी संशयित आरोपी रोहित साळगावकर आणि बंटी सावंत यांना कलम ४१ अ अन्वये नोटिस बजावण्यात आल्याची माहिती कणकवली पोलिसांकडून देण्यात आली.










