राजापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष गंगराम कांबळे यांचे निधन

राजापूर (प्रतिनिधी): येथील राजापूर अर्बन को. ऑप. बँकेचे माजी अध्यक्ष व राजापूर तालुका बौध्दजन संघाचे माजी सरचिटणीस गंगाराम कृष्णा कांबळे (७०) यांचे गुरूवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
मुळचे राजापूर तालुक्यातील गोवळ गावचे रहिवाशी असलेले कांबळे यांचा कायमच राजापूर तालुक्यातील सहकार, सामाजिक, शैक्षणिक कार्यात सक्रिय सहभाग राहिला आहे. राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भुषविले आहे. तर राजापूर तालुका बौध्दजन संघावर सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आहे. समाजबांधवांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी कायमच त्यांचा पुढाकार असे. एक शांत, संयमी आणि मितभाषी व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता.

कांबळे हे मुलांच्या शिक्षणासाठी गेल्या काही वर्षापासून पुणे येथे स्थायिक झाले होते. मात्र त्यांचा राजापुरशी कायम संपर्क असे. गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर मुंबईत खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच गुरूवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालावली.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल राजापूर अर्बन बँक परिवार तसेच राजापूर तालुका बौध्दजन संघाच्या वतीने त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.