साध्या वेशात पोलिसांनी रचला सापळा. पत्नीला भेटायला येणारया संशयितास केले जेरबंद. फिल्मी स्टाईल घडामोड.
मंडणगड : प्रतिनिधी – मागील सात दिवस पोलिसांना गुंगारा देणारा पालवणी येथील मंगळसूत्र चोरी प्रकरणाती संशयितास अखेर मंडणगड पोलिसांनी दि.16 जानेवारी 2025 रोजी ताब्यात घेतले, पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या संशयिताचा अत्यंत हुशारीने मागोवा घेतला, जवळपास फिल्मी घडामोडींप्रमाणे पोलिसांनी त्यास अटक केले. संशयित आपल्या पत्नीस भेटण्यासाठी म्हाप्रळ येथे येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी म्हाप्रळ येथे त्यास पकडण्यासाठी सापळा रचला. ठरलेल्या ठिकाणी संशयित चोर येताच साध्या वेशातील दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याची कॉलर पकडली व त्यास ताब्यात घेतले.
या प्रकरणी सविस्तर वृत्त असे, मंडणगड पोलीस ठाणे येथे आपल्या पत्नीचे मंगळसूत्र चोरीला गेले असल्याची फिर्याद शिवाजी पांडुरंग नवगरे यांनी दिली होती. त्याप्रमाणे दि. 08 जानेवारी 2025 रोजी संशयित समीर शंकर गोसावी (रा. माणगाव ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित हा चक्क फिर्यादी यांचा जावई असल्याचे समोर आले होते. मात्र दाखल केलेल्या फिर्याद दिनांक पासून हा संशियीत तब्बल सात दिवस पोलिसांना गुंगारा देत फरार होता. यानंतर पोलिसांनी आपले जोरदार सूत्र हलवले. संशयिताच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक लोकेशनद्वारे शोध घेऊनही त्याचा ठावठीकांना पोलिसांना सापडला नाही. यावेळी पोलिसांनी माणगाव, दासगाव, महाड या त्याच्या रहिवासी तालुक्याच्या आसपासच्या परिसरात जाऊन त्याचा शोध घेतला. मात्र पोलिसांना त्याचा शोध लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी आपल्या गुप्त सूत्रांना कामाला लावले.
अखेर पोलिसांच्या गुप्त सूत्रांकडून पोलिसांना संशयित दि.16 जानेवारी 2025 रोजी 10.00 वा म्हाप्रळ याठिकाणी आपल्या पत्नीस भेटायला येणार असल्याची माहिती मिळाली. हि गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय धुपकर, पोलीस नाईक सुहास मांडवकर, चालक श्री. देसाई असे पोलीस पथक म्हाप्रळ याठिकाणी साध्या गणवेशात रवाना झाले. गुप्त सूत्राने दिलेल्या माहितीच्या म्हाप्रळ येथील ठिकाणी पोलीस दबा धरुण बसले. ठिक 1.10 वा संशयित हा त्याच्या पत्नीस भेटण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी येताच त्यास शिताफिने ताब्यात घेतले. व त्यास अटक करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शखाली सुरु आहे. मंडणगड पोलिसांनी चोरी प्रकरणातील या संशयितास पकडल्यानंतर तालुक्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.












